नवी दिल्ली : भाजपच्या दिल्ली मुख्यालयाचा पत्ता लवकरच '11 अशोका रोड' ऐवजी '6, दीनदयाल उपाध्याय मार्ग' असा होणार आहे. 18 फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्या उपस्थितीत या नव्या इमारतीचं उद्घाटन होणार आहे.

अवघ्या 16 महिन्यांत या पाच मजली अत्याधुनिक इमारतीचं काम पूर्ण करण्यात आलं. ऑगस्ट 2016 मध्ये पंतप्रधानांच्या हस्ते या कामाचं भूमिपूजन झालं होतं. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार सर्व राजकीय पक्षांना त्यांची कार्यालयं ल्युटन्स दिल्लीच्या बाहेर स्थलांतरित करायची आहेत.

दीनदयाल उपाध्याय मार्गावर 2 एकराच्या परिसरात भाजपने हे नवं मुख्यालय उभारलं आहे. अत्यंत आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त अशा या पाच मजली इमारतीत एकूण 70 खोल्या आहेत. एकाचवेळी 400 वाहनांच्या पार्किंगची सोय आहे. या बांधकामात hollow bricks चा वापर करुन वातावरण थंड ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे, तर विजेसाठी सोलर पॅनलचा वापर करण्यात आलाय.

वॉटर हार्वेस्टिंग, बायोटॉयलेट्सचा समावेश करुन पर्यावरणाची काळजी घेतल्याचा दावा भाजप पदाधिकाऱ्यांनी केला आहे. मुख्यालयात एकाचवेळी 600 लोक बसू शकतील, अशा दोन कॉन्फरन्स रुमही आहेत.

वायफाय, एलिव्हेटर, टेलिव्हिजन मुलाखतींसाठी स्टुडिओ, डिजिटल लायब्ररी अशा सर्व सोयींनी युक्त असं हे मुख्यालय आहे. त्यामुळे 2019 साठी भाजपची वॉर रुम आता 11, अशोका रोडवरुन 6, दीनदयाल उपाध्याय मार्गावर असणार हे निश्चित झालं आहे.