नवी दिल्ली : भाजपमधील वादग्रस्त खासदार साक्षी महाराज यांनी पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फोडलं आहे. साक्षी महाराजांनी सच्चा सौदा पंथाचे प्रमुख गुरमित राम रहीम सिंह याचं समर्थन केले आहे. त्यामुळे आता साक्षी महाराजांसह भाजपवरही टीका सुरु झाली आहे.


“एक व्यक्ती लैंगिक शोषणाचा आरोप करते. मात्र, हा पूर्वग्रहही असू शकतो किंवा हव्यासापोटीही हा आरोप झाला असेल. भारतीय संस्कृतीची प्रतिमा मलीन करण्याचं हे षड्यंत्र आहे. हे अत्यंत नियोजित पद्धतीने रचलेला कट आहे.”, असं धक्कादायक वक्तव्य खासदार साक्षी महाराज यांनी केलं असून, त्यांनी जाहीरपणे राम रहीम यांचं समर्थन केले आहे.

...तर कोर्ट जबाबदार : साक्षी महाराज

“एखाद्या व्यक्तीवर एक व्यक्ती तक्रार करते. मात्र, कोट्यवधी लोक त्याच्यासाठी देव मानतात आणि त्याच्यासाठी प्राण द्यायलाही तयार असतात. हायकोर्टाने या गोष्टीला गांभिर्याने घेतलं पाहिजे. जर यापेक्षाही मोठी घटना घडल्यास त्यासाठी केवळ डेराचे लोक जबाबदार नसतील, तर कोर्टही जबाबदार असेल.”, असे साक्षी महाराज म्हणाले. शिवाय, जर कुणा व्यक्तीची अस्मिता धोक्यात असेल, तर ‘करो या मरो’चा मार्ग अवलंबावा लागतो, असे ते म्हणाले.

दरम्यान, डेरा सच्चा सौदा पंथाचे प्रमुख गुरमित राम रहीम सिंह यांना बलात्कार प्रकरणात दोषी ठरवलं आहे. पंचकुलातील सीबीआय न्यायालयानं हा महत्त्वपूर्ण निकाल दिला. त्यांना सोमवारी शिक्षा सुनावली जाणार आहे. या प्रकरणात किमान सात वर्षे आणि कमाल दहा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होण्याची शक्यता आहे.