लखनऊ :  नेहमीच वेगवेगळ्या वक्तव्यांनी नवा वाद निर्माण करणाऱ्या भाजपचे खासदार साक्षी महाराजांचं नाव मतदार यादीतून गायब झाल्याने, उत्तर प्रदेशमधील नगर पालिका निवडणुकीत मोठा गोंधळ पाहायला मिळाला. नाव गायब झाल्याचं समजल्यानंतर आपल्या विरोधात षडयंत्र असल्याची टीका करत निवडणूक आयोगाच्या काराभारावर तोंडसुख घेतलं.


उत्तर प्रदेशमधील उन्नाव नगर परिषदेसाठी आज मतदान झालं. स्थानिक खासदार साक्षी महाराज मतदानासाठी गेल्यानंतर, त्यांना आपलं नाव मतदार यादीतून गायब झाल्याचं समजलं. यानंतर निवडणूक आयोगाच्या कारभारवर टीका करत, हे आपल्याविरोधातील षडयंत्र असल्याचं सांगितलं.

तसेच या प्रकरणाचा सखोल तपास करुन, दोषींवर कारवाई करण्याची मागणी साक्षी महाराजांनी केली आहे.

दुसरीकडे मतदार यादी घोळात काँग्रेसचे माजी खासदार अन्नू टंडन यांचं ही नाव मतदार यादीतून गायब झालं होतं. त्यांनी याबाबत उप जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यानंतर उप जिल्हधिकाऱ्यांनी चूक मान्य करुन, चौकशीचं आश्वासन दिलं आहे.

दरम्यान, उत्तर प्रदेशातील 24 जिल्ह्यातील 5 महानगरपालिका, 71 नगर परिषद आणि 154 नगर पंचायतीसाठी मतदान झालं. या निवडणुकीसाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गोरखपूर महानगर पालिकेसाठी मतदान केलं.

कोण आहेत साक्षी महाराज?

साक्षी महाराज हे उत्तर प्रदेशमधील उन्नाव लोकसभा मतदार संघातून भाजपचे खासदार आहेत. नेहमी आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे ते नेहमी चर्चेत असतात. कन्नौजमधील आपल्या एका भाषणात त्यांनी मदरशांसदर्भातील एका वक्तव्याने मोठा वाद निर्माण केला. तसेच मेरठमधील आपल्या एका भाषणात त्यांनी हिंदू धर्माच्या रक्षणासाठी प्रत्येक हिंदू व्यक्तीने चार मुलांना जन्म दिला पाहिजे, असं वक्तव्य करुन नव्या वादाला तोंड फोडलं होतं.