रामपूर : जम्मू-काश्मीरमध्ये जवान शहीद झाल्याची घटना ताजी असतानाच, उत्तर प्रदेशच्या रामपूर लोकसभा मतदारसंघाचे भाजप खासदार नेपाल सिंह यांनी एक वादग्रस्त वक्तव्य दिलं आहे. “लष्करात आहात, तर जीव जाणारच,” असं नेपाल सिंह यांनी म्हटलं आहे.

नेपाल सिंह म्हणाले की, “ आर्मीत आहात, तर तिथं जीव जाणारचं! असा कोणता देश आहे, ज्यांच्या (दोन देशांच्या) वादात लष्कराचा माणसाचा मृत्यू होत नाही? गावातही दोन गटात वाद होतात. तिथेही एक ना अनेकजण जखमी होतात.”


विशेष म्हणजे, नेपाल सिंहांनी अजब प्रश्नही उपस्थित केला आहे. ते पुढे म्हणाले की, “असं एखादं डिव्हाईस सांगा, ज्याने माणसाला जीव गमवावा लागत नाही? अशी एखादी वस्तू सांगा, ज्याने गोळ्यांची आवश्यक्ताच भासणार नाही. पण ती वस्तूच सर्व काम करेल.”

आपल्या वक्तव्यावरुन वाद निर्माण होण्याची शक्यता पाहताच, त्यावर त्यांनीच तात्काळ स्पष्टीकरण दिलं आहे. सिंह यांनी सांगितलं की, “लष्करातील जवानांचा अपमान होईल असं वक्तव्य मी केलं नाही. मी दु: खी आहे. यावर माफी मागतो. पण मी असे काहीच म्हटले नाही.”

दरम्यान, रविवारी जम्मू-काश्मीरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या ट्रेनिंग कॅम्पवर हल्ला केला. दहशतवाद्यांच्या या हल्ल्याला भारतीय लष्कराने चोख प्रत्युत्तर दिलं. पण या हल्ल्यात पाच जवान शहीद झाले. तर जैशच्या दोन दहशतवाद्यांना भारतीय जवानांनी कंठस्नान घातलं.