BJP MP threaten congress : शेतकऱ्यांनी भाजपचे माजी मंत्री मनीष ग्रोवर यांना ओलीस ठेवल्याची घटना शुक्रवारी घडली. त्यानंतर हरयाणा रोहतकचे भाजप खासदार अरविंद शर्मा यांनी काँग्रेसला धमकी दिली. मनीष ग्रोवर यांच्याकडे डोळे वर करून पाहिले तर डोळे काढू आणि कोणी हात उचलला तर हात छाटू अशी उघड धमकी दिली आहे. भाजप कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्यांना ओलीस ठेवल्याच्या निषेधार्थ हरयाणाचे माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुड्डा आणि काँग्रेस खासदार दिपेंद्र हुड्डा यांच्याविरोधात निदर्शने केली. या निदर्शनाच्या वेळी बोलताना खासदार अरविंद शर्मा यांनी बेताल वक्तव्य केले.
या निषेध आंदोलनाच्या दरम्यान अरविंद शर्मा यांनी काँग्रेसविरोधात टीका केली. त्यांनी म्हटले की, काँग्रेस सत्तेत येण्यासाठी हातपाय मारत आहे. मात्र, पुढील 25 वर्षापर्यंत काँग्रेस अशीच फिरत राहणार. पुढील 25 वर्ष भाजपची सत्ता कायम असणार असल्याचे त्यांनी म्हटले.
शुक्रवारी भाजपचे माजी मंत्री मनीष ग्रोवर यांच्यासह इतर भाजप नेत्यांना रोहतकमधील किलोई गावातील शेतकऱ्यांनी ओलीस ठेवले होते. इतकंच नाही तर त्यांच्या वाहनाची हवाही काढली. शेतकऱ्यांच्या या आक्रमक पवित्र्यानंतर पोलिसांची कुमक वाढवण्यात आली. ग्रोवर यांनी कृषी कायद्याला विरोध करणाऱ्यांना बेरोजगार, दारुडे आणि समाजकंटक म्हटले होते. त्यानंतर शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आणि त्यांना ओलीस ठेवले.
माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुड्डा यांच्या क्षेत्रातील प्रमुख गाव किलोईमध्ये शेतकऱ्यांनी भाजप नेत्यांना सायंकाळी चार वाजेपर्यंत शिव मंदिरात ओलीस ठेवले होते.
उत्तराखंडमधील केदारनाथ धाम येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पूजा-दर्शनसह जवळपास 400 कोटी रुपयांच्या प्रकल्पाचे भूमीपूजन, लोकार्पण सोहळ्याचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. हा सोहळा सुरू असताना देशभरातील शिव मंदिरात भाजपकडून थेट प्रक्षेपणाचे आयोजन करण्यात आले. यावेळी भाजप नेत्यांनी उपस्थिती दर्शवली होती.