नवी दिल्ली : नागपुरातील काटोलचे भाजप आमदार आशिष देशमुख यांनी अखेर काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. नवी दिल्लीत काँग्रेस मुख्यालयात आमदार आशिष देशमुख यांचा काँग्रेस प्रवेश झाला.


2 ऑक्टोबर रोजी आशिष देशमुख यांनी भाजपसह आपल्या विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार, हे जवळपास निश्चित मानले जात होते. आता त्यांनी नवी दिल्लीत जाऊन काँग्रेसमध्ये अधिकृत पक्षप्रवेश केलाय.

कोण आहेत आशिष देशमुख?

44 वर्षीय आशिष देशमुख हे नागपूरमधील काटोल मतदारसंघातून भाजपचे आमदार आहेत. देशमुख हे काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि माजी मंत्री रणजित देशमुख यांचे पुत्र आहेत.

उच्चशिक्षित असलेल्या आशिष देशमुखांनी 'ग्रामविकासाचा पासवर्ड' पुस्तकही लिहिले आहे. इंडस्ट्रियल स्पेशलायझेशनमध्ये पदव्युत्तर शिक्षण आणि फायनान्समध्ये एमबीए आणि पीएचडी असे उच्चशिक्षण घेतलेले आशिष देशमुख यांची महाराष्ट्रातील सर्वाधिक शिकलेल्या राजकीय नेत्यांमध्ये गणना होते.

वेगळ्या विदर्भाचा मुद्दा असो वा शेतकऱ्यांचे प्रश्न असो, जनतेच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरुन आंदोलन आमदार आशिष देशमुख कायम दिसतात. त्यामुळे देशमुखांचा काँग्रेस प्रवेश म्हणजे नागपुरात रस्त्यावर लढणारा नेता काँग्रेसला मिळाला आहे. काँग्रेसला आक्रमक चेहऱ्यांची नितांत गरज असण्याच्या काळात विदर्भात आशिष देशमुख यांच्या रुपाने अभ्यासू आणि आक्रमक नेता पक्षात आल्याने काँग्रेसला याचा मोठा फायदा होणार आहे.