मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकांसाठी (Loksabha Election 2024) भाजपने (BJP) कंबर कसली आहे. निवडणुकांसाठी वेगवेगळ्या राज्यांमध्ये पक्षांकडून रणनिती आखल्या जातात. याच दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) 13 जानेवारी रोजी बिहारमधील रमन मैदानात एका रॅलीला संबोधित करणार आहेत. त्यानंतर पंतप्रधान मोदी हे बिहारमधून चंपारणमधून आगामी लोकसभा निवडणुकांसाठी प्रचाराला सुरुवात करणार असल्याची माहिती समोर येतेय. 


पक्षातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यावेळी पंतप्रधान मोदी हे  बिहारमधील रस्ते आणि पुलांसह विविध प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करण्याची शक्यता आहे. बिहारमध्ये 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने सर्वसमावेशक योजना आखल्या आहेत. राज्यातील सर्व 40 जागा जिंकण्याचे पक्षाचे लक्ष्य आहे.


पंतप्रधान मोदींशिवाय पक्षाचे इतरही नेते करणार प्रचार


एएनआयच्या वृत्तानुसार, पक्षाच्या सूत्रांचे म्हणणे आहे की पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये बिहारमध्ये अनेक रॅलींना संबोधित करू शकतात. सर्व प्रमुख रॅली 15 जानेवारीनंतर होण्याची अपेक्षा आहे, जेव्हा निवडणूक प्रचारावरील निर्बंध उठवले जातील. पीएम मोदी राज्यातील बेगुसराय, बेतिया आणि औरंगाबाद येथे तीन सभांना संबोधित करू शकतात.


जेपी नड्डा सीमांचल क्षेत्रावर लक्ष केंद्रित करणार


अमित शाह जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये सीतामढी, मधेपुरा आणि नालंदा येथे सभांना संबोधित करतील अशी माहिती देण्यात आलीये. जेपी नड्डा अनेक ठिकाणी रॅली काढू शकतात, विशेषत: त्यांचे लक्ष सीमांचल आणि बिहारच्या पूर्व भागावर असेल. 2019 च्या निवडणुकीपेक्षा यावेळी बिहारमधील राजकीय परिस्थिती वेगळी आहे. तेव्हा राज्यात जेडीयूसह भाजपची सत्ता होती. यावेळी ते विरोधी पक्षात आहेत, तर जेडीयू महाआघाडी सरकारचा भाग आहे.


नितीश कुमारांकडून विरोधकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न 


बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी विरोधी पक्षांच्या नेत्यांची यशस्वीपणे एकजूट केली असून, भाजपसोबतच्या मागील युतीमध्ये बदल केला आहे. बिहारमधील लोकसभेच्या सर्व 40 जागांसाठी लढत निश्चित आहे, जिथे गेल्या निवडणुकीत एनडीएने 39 जागा जिंकल्या होत्या, तर काँग्रेसने एक जागा जिंकली होती.


हेही वाचा : 


Bilkis Bano Case : बिल्कीस बानोप्रकरणी उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, 11 आरोपींच्या सुटकेविरोधातल्या याचिकेवर मोठा निर्णय होण्याची शक्यता