कोची : केरळमध्ये भाजप पक्षाची वाढ का होत नाही यावर केरळ भाजपचे नेते आणि राज्यातले पक्षाचे एकमेव आमदार ओ राजगोपाल यांनी एक महत्वपूर्ण वक्तव्य केलं आहे. केरळमधील लोक उच्चशिक्षित असल्याने भाजपला मतदान करत नाहीत असं वक्तव्य त्यांनी केलं असून त्याची बातमी आता व्हायरल होताना दिसत आहे. ओ राजगोपाल यांनी दोन दिवसांपूर्वी इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत हे वक्तव्य केलं आहे.
आमदार ओ राजगोपाल म्हणाले की, "केरळ हे राज्य इतर राज्यांहून वेगळं आहे. या राज्यात भाजपची वाढ होत नाही त्यामागे दोन-तीन गोष्टी आहेत. त्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या राज्यातील साक्षरता दर हा 90 टक्के इतका आहे. लोक उच्चशिक्षित असल्याने त्यांना वाटतं की ते कोणत्याही प्रश्नावर वाद-विवाद करू शकतात, उच्चशिक्षित लोकांची ही सवयच आहे."
आमदार ओ राजगोपाल पुढे म्हणाले की, "दुसरा मुद्दा म्हणजे या राज्यात हिंदूंचे प्रमाण हे 55 टक्के इतके आहे तर अल्पसंख्यांकांचे प्रमाण हे 45 टक्के आहे. त्यामुळे भाजपची राजकीय गणिते जुळत नाहीत. याच कारणामुळे केरळची तुलना इतर राज्यांशी होऊ शकत नाही. या राज्यातील परिस्थिती वेगळी आहे आणि आम्ही हळू का असेना पण सातत्याने प्रयत्न करत आहोत."
डाव्या पक्षांना काठावरचे यश मिळण्याची शक्यता आहे आणि कॉंग्रेसकडे लोक जात नाहीत कारण कॉंग्रेस ही बुडती जहाज आहे असे लोकांना वाटतंय असंही ते म्हणाले.
केरळमधील लोक उच्चशिक्षित असल्याने भाजपला मतदान करत नाहीत या ओ राजगोपाल यांच्या वक्तव्यावर कॉंग्रेस नेते शशी थरूर यांनी आपलं मत व्यक्त केलंय. ते म्हणतात की, "माझ्या मित्राने एका मुलाखतीत हा महत्वपूर्ण खुलासा केलाय की केरळमधील लोक उच्चशिक्षित आहेत आणि ते विचार करतात, त्यामुळेच ते भाजपला मतदान करत नाहीत."
महत्वाच्या बातम्या :
- बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू आणि पुडुचेरीचा अंतिम Opinion Poll, एका क्लिकवर पहा कुठे कोणाचे सरकार यईल?
- West Bengal Opinion Poll 2021 : ममता बनर्जी, दिलीप घोष, मुकुल रॉय आणि अधीर रंजन मुख्यमंत्री म्हणून कुणाला पसंती? काय म्हणतोय सर्वे?