भोपाळ : मध्य प्रदेशात दोन वर्षांपूर्वी झालेल्या तरुणीच्या हत्येचा उलगडा करण्यात इंदूर पोलिसांना यश आलं आहे. विवाहबाह्य संबंधातून स्थानिक भाजप नेता, त्याची तीन मुलं आणि त्यांच्या साथीदाराने एका तरुणीची निर्घृण हत्या केली. विशेष म्हणजे अजय देवगन-तब्बू यांची भूमिका असलेल्या 'दृश्यम' चित्रपटावरुन प्रेरणा घेत ही हत्या घडवून आणली होती. पोलिसांनी या प्रकरणी पाच आरोपींना अटक केली आहे.


मध्य प्रदेशातील बाणगंगामध्ये राहणाऱ्या 22 वर्षीय ट्विंकल डागरेची हत्या झाली होती. या प्रकरणी 65 वर्षीय भाजप नेते जगदीश करोतिया उर्फ कल्लू पहलवान, त्याची तीन मुलं अजय, विजय आणि विनय, तसेच साथीदार निलेश कश्यप यांना बेड्या ठोकल्या आहेत. ट्विंकल आणि जगदीश करोतिया यांचे कथित विवाहबाह्य संबंध होते. ट्विंकलला करोतिया कुटुंबासोबत त्यांच्या घरात राहायचं होतं. यातूनच गृहकलहाला सुरुवात झाली आणि ट्विंकलचा जीव गेला.

रोजच्या कटकटींना कंटाळून करोतियांनी ट्विंकलच्या हत्येचा कट रचला. 16 ऑक्टोबर 2016 रोजी पाच जणांनी मिळून ट्विंकलची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर तिचा मृतदेह जाळण्यात आला. जिथे ट्विंकलचा मृतदेह जाळण्यात आला होता, तिथून पोलिसांनी तिचं ब्रेसलेट आणि जोडवी जप्त केल्या.

आरोपींनी दृश्यम चित्रपट पाहून त्यातून आयडिया उचलली. कुत्र्याचा मृतदेह त्यांनी एके ठिकाणी जाळला आणि खड्ड्यात कोणाचा तरी मृतदेह गाडल्याची अफवा स्वतःच पसरवली. पोलिसांनी खोदकाम करताच कुत्र्याचा अवशेष सापडला. त्यामुळे पोलिसांचा तपास काहीसा भरकटला.

पोलिसांनी गुजरातमधील प्रयोगशाळेतून करोतिया आणि त्यांच्या दोन मुलांची ब्रेन इलेक्ट्रिकल ऑसलेशन सिग्नेचर (बीईओएस) चाचणी केली. शहराच्या इतिहासात पहिल्यांदाच एखादा गुन्हा सोडवण्यासाठी या टेस्टचा वापर करण्यात आला.