नवी दिल्ली :  पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आतापर्यंत केलेल्या कामाना आणि विशेषत: कोरोना काळात केलेल्या कामांना सामान्यापर्यंत पोहोचवण्यासाठी भाजपकडून आजपासून देशभरात 'जन आशीर्वाद' यात्रा सुरु करण्यात आली आहे. या जन आशीर्वाद यात्रेत केंद्र सरकारचे 39 मंत्री हे देशभरातील 212 लोकसभा मतदारसंघांपर्यंत पोहोचणार आहेत. महाराष्ट्रातील केंद्रीय मंत्र्यांनीही आपल्या 'जन आशीर्वाद' यात्रेची सुरुवात केली आहे. 


केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांच्या नेतृत्वाखाली पालघरमधून जन आशीर्वाद यात्रा सुरु झाली आहे. केंद्र सरकारची कामं लोकांपर्यंत पोहोचवणं आणि राज्यातील महाविकास आघाडीचे अपयश लोकांना सांगणे हा उद्देश या यात्रेमागे असल्याचं त्यांनी सांगितलं. केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार म्हणाल्या की, "कोरोना काळात आम्ही कुठेही थांबलो नाही. मोदी शासनाने तळागाळातल्या लोकांसाठी काम केलं, सर्वांसाठी मोफत लसीकरण सुरु केलं. भारतात सर्वात मोठा लसीकरणाचा कार्यक्रम सुरु करण्यात आला असून याचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदींना जातंय. उज्ज्वला सारख्या योजना असतील किंवा इतर योजना असतील, यापासून कुणीही लाभार्थी वंचित राहू नये यासाठी ही जन आशीर्वाद यात्रा सुरु करण्यात आली आहे."


केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला सर्वाधिक लसी देण्यात आल्या आहेत, पण तरीही महाविकास आघाडीकडून सातत्याने केंद्र सरकारवर टीका केली जाते असंही डॉ. भारती पवार म म्हणाल्या. जन आशीर्वाद यात्रेला राजकीय दृष्टीनं बघू नये असही त्या म्हणाल्या. राज्यात केंद्रीय मंत्री कपिल पाटील, डॉ. भागवत कराड आणि रावसाहेब दानवे यांनीही आपापल्या भागात जन आशीर्वाद यात्रा सुरु केल्या आहेत. 


भाजपची ही जन आशीर्वाद यात्रा 19,567 किमीहून अधिक लांबीची असणार असून ती 19 राज्यातून जाणार आहे. या दरम्यान 1663 लहान-मोठे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. पुढच्या वर्षी उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणूका असल्याने या जन आशीर्वाद यात्रेमध्ये त्या राज्यावर जास्त लक्ष केंद्रीत करण्यात येतअसल्याचं समजतंय. 


महत्वाच्या बातम्या :