शिलाँग (मेघालय) : 'मोदी सरकार हे सुटाबुटांच सरकार आहे.' अशी टीका करणाऱ्या काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींवर आता भाजपने त्यांच्या जॅकेटवरुन निशाणा साधला आहे.

राहुल गांधी सध्या मेघालयच्या दौऱ्यावर आहेत. काल (मंगळवार) शिलाँगमध्ये मेघालयचे मुख्यमंत्री मुकुल संगमा यांच्यासोबत राहुल गांधी एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी थंडीपासून बचाव व्हावा यासाठी त्यांनी काळ्या रंगाचं एक जॅकेट परिधान केलं होतं. पण आता याच जॅकेटवरुन राजकारण सुरु झालं असून भाजपने काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे.

भाजपने असा दावा केला आहे की, राहुल गांधींनी जे जॅकेट परिधान केलं होतं. ते लंडनच्या 161 वर्ष जुनी कंपनी 'बरबरी'चं आहे. बरबरी हा जॅकेट, कपडे आणि चष्माचा प्रसिद्ध ब्रॅण्ड आहे. भाजपनं असा आरोप केला आहे की, 'राहुल गांधींचं हे जॅकेट काँग्रेसने केलेल्या भ्रष्टाचारातूनच हे जॅकेट आलं आहे.' असाही आरोप भाजपने केला आहे. ब्लूमिंगडेल्स वेबसाइटच्या मते, या जॅकेटची किंमत 68145 रुपये आहे.




भाजपने राहुल गांधींवर टीका केल्यानंतर काँग्रेस नेत्या प्रियंका चतुर्वेदी यांनी देखील भाजपला तात्काळ उत्तर देत पंतप्रधान मोदींचा सूट आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाहा यांच्या चष्माच्या फोटो ट्वीट करुन पलटवार केला आहे.

'हे लोकं या गोष्टीने चिंताग्रस्त आहेत की, राहुल गांधी हे मेघालयमधील लोकांमध्ये मिसळत आहेत. कारण की, आता मेघालयमधील जनता ढोंगीपणा आणि खोट्या आश्वासनांसाठी तयार नाही.' असं ट्वीट करत प्रियंका चतुर्वेदी यांनी भाजपला प्रत्युत्तर दिलं.


दरम्यान, 27 फेब्रुवारीला मेघालयमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहे. त्यामुळे आता येथील राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून एकमेकांवर वार-पलटवार सुरु झाले आहेत. गेली 15 वर्ष मेघालयमध्ये काँग्रेसची सत्ता असल्याने आता भाजपने मेघालय जिंकण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत.