ट्रेनसमोर सेल्फी घेताना अपघात नव्हे, 'तो' निव्वळ प्रँक व्हिडिओ
एबीपी माझा वेब टीम | 30 Jan 2018 11:46 PM (IST)
तेलंगणामध्ये राहणारा जिम इन्स्ट्रक्टर शिवा आणि त्याच्या मित्रांनी अख्ख्या जगाला मूर्खात काढलं आहे.
हैदराबाद : वेगाने धडधडत येणाऱ्या ट्रेनसमोर सेल्फी घेण्याचा प्रयत्न करताना इंजिनच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा व्हिडिओ तुम्हाला आठवत आहे? तो व्हिडिओ पाहून अनेक जणांची झोप उडाली असेल, तर कोण त्याच्या काळजीपोटी तळमळत असेल. इतरांचा थरकाप उडवणारा तरुण स्वतः मात्र शांत चित्ताने झोपला आहे. कहानी में ट्विस्ट म्हणावा अशी काहीशी परिस्थिती आहे. तेलंगणामध्ये राहणारा जिम इन्स्ट्रक्टर शिवा आणि त्याच्या मित्रांनी अख्ख्या जगाला मूर्खात काढलं आहे. कारण 'तो' व्हिडिओ म्हणजे निव्वळ एक प्रँक व्हिडिओ असल्याचा दावा केला जात आहे. व्हिडिओमध्ये काय 'दिसतं'? एमएमटीएस ट्रेन येत असताना ट्रॅकच्या शेजारी शिवा उभा होता. स्मार्टफोन हातात घेऊन कॅमेरात बघून तो हसत होता, तर उजव्या हाताने ट्रेनकडे बोट दाखवत होता. मागून ट्रेन येत होती आणि त्याला सावध करण्यासाठी लोको पायलट सातत्याने हॉर्न देत होता. मात्र तरीही शिवा तिथून बाजूला सरकला नाही. अखेर ट्रेन जवळ आली आणि त्याला धडक देऊन निघून गेली. त्याच्या जवळपास असणाऱ्यांचे चित्कार आणि गडबड व्हिडिओमध्ये ऐकू येतात. व्हिडिओमध्ये त्याला धडक बसतानाची दृश्य तुम्हाला विचलित करु शकतात. शिवाचा कथित बनावट व्हिडिओ :