नवी दिल्ली : काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आपल्या ताज्या परदेश दौऱ्याची ट्विटरवर घोषणा केली आणि राजधानीत त्यावरुन जोरदार गदारोळही सुरु झाला. आजीला आणि इतर कुटुंबियांना भेटण्यासाठी परदेशी जात असून पुढचे काही दिवस इटलीत असेन, असं राहुल गांधींनी ट्विटरवर जाहीर केलं.


मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास राहुल गांधींनी हे ट्विट केलं आणि पुढच्या तासाभरात भाजप मुख्यालयातून टीकेच्या तोफा धडाडू लागल्या. सध्याच्या राजकीय वातावरणात राहुल गांधींच्या टायमिंगची दबक्या आवाजात चर्चा होत असताना भाजप प्रवक्ते जी व्ही एल नरसिंह राव यांनी 'राहुल गांधींच्या परदेश दौऱ्यानं आपल्याला कुठलाही आश्चर्याचा धक्का बसला नाही. राहुल गांधी हे त्यांच्या विदेश दौऱ्यांच्या मध्ये वेळ मिळाला की भारताला भेट देत असतात' असा खोचक टोला लगावला.

काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी मात्र राहुल गांधी हे त्यांच्या 93 वर्षांच्या आजीला भेटायला जात असून, या गोष्टीचं नाहक राजकारण करु बघणाऱ्यांचा आम्ही तीव्र निषेध करतो असं म्हटलेलं आहे.

https://twitter.com/OfficeOfRG/status/874554135982428160
राजकारणात नेत्यांनी लोकांसाठी सतत उपलब्ध असणं गरजेचं असतं, आणि राहुल गांधींची राजकीय कमिटमेंट आजवर कधी दिसलीच नाही असा आरोप भाजपचे नेते सतत करत असतात.

सध्या मध्य प्रदेशात शेतकऱ्यांच्या आंदोलनावरुन वातावरण पेटलं आहे. राहुल गांधींनी मंदसौरमध्ये जाऊन या शेतकऱ्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला होता. पंतप्रधान हे शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करत असल्यानंच त्यांच्यावर ही वेळ आल्याचा आरोप केला होता.

ज्यावेळी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी राष्ट्रपतीपदासाठी विरोधकांची मोट बांधण्यात व्यस्त आहेत, तेव्हाच राहुल गांधी परदेशी जात आहेत. प्रकृती अस्वास्थामुळे ज्या सोनिया गांधी, गेल्या काही महिन्यांत सार्वजनिक कार्यक्रमात दिसत नव्हत्या. त्यांच्याकडेच पुन्हा एकदा विरोधकांची एकजूट करण्याची जबाबदारी आलेली आहे.

यूपीएकडे विजयी होण्याइतकं संख्याबळ नसलं तरी 2019 साठी विरोधकांच्या एकीची रंगीत तालीम म्हणून ही निवडणूक महत्वाची आहे. बुधवारी यासंदर्भात जवळपास 17 विरोधी पक्षांची बैठक राजधानी दिल्लीत होत आहे. राहुल गांधी मात्र या बैठकीला उपस्थित नसतील. येत्या 19 जूनला राहुल गांधी वयाची 47 वर्षे पूर्ण करतील. या वाढदिवसालाही ते परदेशातच असतील.