नवी दिल्ली : महाराष्ट्रातून राज्यसभेसाठी भाजपकडून प्रकाश जावडेकर, धर्मेंद्र प्रधान आणि नारायण राणे या तिघांची नावं निश्चित झाली आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. मुंबईत भाजपच्या राज्य निवड समितीच्या बैठकीत ही नावं अंतिम झाली.


राज्यसभेच्या एकूण 58 जागांसाठी देशभरात निवडणूक होणार आहे. त्यातील 6 जागा महाराष्ट्रातून आहेत. विधानसभेचे संख्याबळ पाहता, तीन जागांवर भाजपचा विजय निश्चित मानला जातो आहे. त्यामुळे या तीन जागांवर महाराष्ट्रातून भाजप कुणाला राज्यसभेवर पाठवतं, याची उत्सुकता सर्वांनाच लागली होती.

भाजपची राज्य पातळीवर आणि केंद्रीय पातळीवर स्वतंत्र निवड समित्या आहेत. त्यापैकी राज्य निवड समितीने राज्यसभेच्या तीन जागांवर नावं निश्चित केली आहेत. प्रकाश जावडेकर, धर्मेंद्र प्रधान आणि नारायण राणे या तिघांचा त्यात समावेश आहे.

प्रकाश जावडेकर हे विद्यमान केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री असून, ते सध्या मध्य प्रदेशमधून राज्यसभेवर गेले आहेत. त्यामुळे आता ते होम ग्राऊंडवरुन म्हणजे महाराष्ट्रातून राज्यसभेत जातील.

धर्मेंद्र प्रधान मूळचे ओदिशातील असून, ते विद्यमान केंद्रीय पेट्रोलियम मंत्री आहेत. त्यांचा राज्यसभेचा कार्यकाळ संपत असल्याने, त्यांना महाराष्ट्रातून उमेदवारी दिली जाणार आहे.

तिसरे नावं प्रचंड महत्त्वाचे मानले जात आहे, ते म्हणजे नारायण राणे. काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष स्थापन करुन, एनडीएत राणेंनी सहभाग घेतला. मात्र राज्यातील मंत्रिपदाच्या आशेवर असणाऱ्या राणेंना राज्यसभेवर जावं लागण्याची शक्यता आहे. नारायण राणे यांचं नाव भाजपच्या राज्य निवड समितीने निश्चित केले आहे. त्यामुळे राणेंची भूमिका काय, हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरणार आहे. कारण आजच एबीपी माझाला दिलेल्या एक्स्क्लुझिव्ह मुलाखतीत राणेंनी म्हटले होते की, राज्यसभेची ऑफर आहे, मात्र विचार करुन ठरवेन.

भाजपच्या राज्य निवड समितीने जावडेकर, प्रधान आणि राणे यांची नावं निश्चित केली असली, तरी या नावांवर अंतिम शिक्कामोर्तब केंद्रीय निवड समिती करेल. भाजपच्या या केंद्रीय समितीची बैठक 3 मार्च रोजी दिल्लीत होणार आहे.