नवी दिल्ली : जर दोन सज्ञान व्यक्ती परस्पर संमतीने विवाह करत असतील, तर तिसऱ्या व्यक्तीने आडकाठी करण्याचा प्रश्नच येत नाही, असं म्हणत सुप्रीम कोर्टाने खाप पंचायतीचे कान उपटले आहेत. कुटुंबीय असो किंवा समाज, त्यांना या विवाहाशी काही देणंघेणं नसल्याचं सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी स्पष्ट केलं.


कोणीही वैयक्तिक, सामूहिक किंवा संघटनात्मक पद्धतीने अशा लग्नात खोडा घालू शकत नाही, असं सुप्रीम कोर्टाने सांगितलं. दर दोन सज्ञान व्यक्ती परस्पर संमतीने लग्न करत असतील, तर त्यांना जबरदस्ती वेगळं करणं चुकीचं आहे, असं कोर्टाने दरडावून सांगितलं.

दोन सज्ञान व्यक्तींच्या लग्नात नाक खुपसणारे तुम्ही कोण? असा प्रश्न सुप्रीम कोर्टाने खाप पंचायतीच्या वकिलांना विचारला. 'कायदा त्याच्या पद्धतीने काम करेल. तुम्ही अशा जोडप्यांबाबत काळजी करु नका. कायदा आहे आणि कायदा त्याचं काम करेल. ज्या दोघांचं लग्न झालं आहे, त्यांच्या अधिकारांबाबत आम्हाला चिंता वाटते' असं कोर्ट म्हणालं.

खाप पंचायत प्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु आहे. कुठल्याही तरुण किंवा तरुणीला समन्स बजावून खाप पंचायत लग्न करण्यापासून थांबवू शकत नाही, असं सुप्रीम कोर्टाने गेल्या सुनावणीवेळी सांगितलं होतं. सज्ञान तरुण-तरुणीला लग्न करण्यापासून रोखणं बेकायदेशीर असल्याचं कोर्टाने स्पष्ट केलं.

खाप पंचायतीवरील सुनावणी दरम्यान एका याचिकाकर्त्याने दिल्लीतील फोटोग्राफर अंकिता सक्सेनाच्या हत्येचं प्रकरण उचलून धरलं. अंकितची हत्या हे ऑनर किलिंग आहे, दोषींवर तात्काळ कारवाई व्हायला हवी, असं मत सुप्रीम कोर्टाने व्यक्त केलं. मात्र हे प्रकरण आमच्यासमोर न आल्यामुळे त्यावर काही बोलू शकत नाही, असं कोर्टाने स्पष्ट केलं.