बशीरहाट : पश्चिम बंगालमधील भाजप आणि तृणमूल काँग्रेस मधील वाद चिघळला असून आज भाजपकडून 12 तासांच्या पश्चिम बंगाल बंदची हाक देण्यात आली आहे. पश्चिम बंगाल मधील बशीरहाट लोकसभा मतदारसंघात झालेल्या हिंसाचारात मृत्यू झालेल्या भाजप कार्यकर्त्यांचे मृतदेह पक्ष कार्यालयात नेण्यास पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर वातावरण तणावपूर्ण झाले होते. यानंतर पक्षाचे सरचिटणीस राहुल सिन्हा यांनी 12 तासांच्या पश्चिम बंगाल बंदची हाक दिली आहे.


लोकसभा निवडणुकीनंतरही पश्चिम बंगालमधील हिंसाचार थांबलेला दिसत नाही. येथील बशीरहाट लोकसभा मतदारसंघात शनिवारी झालेल्या हिंसाचारात तीन भाजप कार्यकर्ते आणि तृणमूल काँग्रेसच्या एका कार्यकर्त्याचा मृत्यू झाला आहे. या भाजप कार्यकर्त्यांचे मृतदेह अंत्यसंस्कारापूर्वी भाजप कार्यालयात नेण्यास पोलिसांनी विरोध केला. त्यानंतर भाजप कार्यकर्ते आणि पोलिस यांच्यात वाद होऊन परिस्थिती तणावपूर्ण झाली. यावेळी संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावरच अंत्यसंस्कार करण्याची तयारी केली होती. शेवटी भाजप कार्यकर्त्यांच्या मृतदेहांवर त्यांच्या गावी अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेण्यात आला.


भाजपकडून पश्चिम बंगालमध्ये आज काळा दिवस पाळण्यात येणार आहे. तसेच घटनेतील पोलिसांच्या भूमिकेविरोधात कोर्टातही जाणार असल्याची माहिती राहुल सिन्हा यांनी दिली आहे.