मध्य प्रदेशमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीनंतर राज्यसभेत भाजपचे नवनिर्वाचित खासदार संपतिया उइके यांचा शपथविधी झाला. केंद्रीय मंत्री अनिल दवे यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक झाली होती. उइके हे बिनविरोध निवडून आले आहेत.
भाजपच्या नेतृत्वाखाली असलेल्या एनडीएकडे या सभागृहात निर्णायक बहुमत नाही. मात्र जेडीयू सोबत आल्याने त्यांची ताकद वाढली आहे. पुढील वर्षीपर्यंत म्हणजे 2018 पर्यंत राज्यसभेत काँग्रेसच सर्वात मोठा पक्ष राहिला असता. पण त्यांच्या दोन सदस्यांच्या मृत्यूमुळे त्यांच्या खासदारांची संख्या कमी झाली.
दुसरीकडे, तामिळनाडूमधील सत्ताधारी अण्णा द्रमुक पक्षही एनडीएमध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे. तसं झाल्यास राज्यसभेत भाजपची स्थिती आणखी मजबूत होईल. सध्या अनेक महत्वाच्या विधेयकांच्या वेळी अण्णा द्रमुकने भाजपला साथ दिलेली आहे. मात्र ते अधिकृतरित्या एनडीएचे सदस्य नाहीत. अण्णा द्रमुकचे राज्यसभेत 12 खासदार आहेत.
राज्यसभेत बहुमत नसल्यामुळे मोदी सरकारची अनेक महत्त्वपूर्ण विधेयकं अडकली आहेत. राज्यसभेत विधेयक संमत करताना भाजपला आपल्या सहकारी पक्षांशिवाय इतर पक्षांच्या मदतीची गरज भासत असते. पुढील वर्षी उत्तर प्रदेशमध्ये राज्यसभेच्या 9 जागांसाठी निवडणुका होणार आहेत. यातील 9 पैकी 8 जागांवर भाजपचा उमेदवार निवडून येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.