नवी दिल्ली : देशातील विविध भागांमधील 100 हून अधिक पूल कोसळण्याच्या स्थितीत आहेत. त्याकडे तातडीनं लक्ष देण्याची गरज आहे, अशी माहिती केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांनी संसदेत दिली. लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात ते बोलत होते.


केंद्र सरकारने गेल्या वर्षभरात देशभरातील १ लाख ६० हजार पुलांचे सेफ्टी ऑडिट केलं. यामध्ये 100 हून अधिक पूल कोसळण्याच्या अवस्थेत असल्याचे समोर आलंय.

गेल्या वर्षी तब्बल ४२ जणांचे जीव घेणाऱ्या महाड पूल दुर्घटनेचाही गडकरींनी उल्लेख केला.

2 ऑगस्ट 2016 रोजी रायगड जिल्ह्यातील महाड परिसरात झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे सावित्री नदीवरील ब्रिटिशकालीन पूल वाहून गेला होता. यात दोन एसटी बस आणि एक कार पुराच्या पाण्यात वाहून गेली होती.

महाडसारख्या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी गेल्या वर्षीपासून सरकारने देशभरातील पुलांची माहिती गोळा करुन, सेफ्टी ऑडिटचे काम हाती घेतलं, असंही त्यांनी यावेळी सभागृहाला सांगितलं.