नवी दिल्ली : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाची देशभरात जोरदार तयारी सुरु आहे. येत्या 17 सप्टेंबरला मोदींचा 66वा वाढदिवस आहे. यावेळी अनेक विश्वविक्रम बनवण्याची जय्यत तयारी सुरु आहे. यंदा मोदी त्यांचा वाढदिवस त्यांच्या जन्मगावी म्हणजेच गुजरातमधील नवसारीमध्ये साजरा करणार आहेत.
भाजपने पक्षाच्या खासदार आणि आमदारांना नरेंद्र मोदींचा वाढदिवस 'सेवा दिवस' म्हणून साजरा करण्याचा सल्ला दिला आहे. 17 सप्टेंबरला मोदींच्या जन्मदिनी भाजपाध्यक्ष अमित शाह तेलंगणात स्वच्छ अभियानात सहभागी होणार आहेत.
गुजरातच्या सूरतमध्ये मोदींच्याच हस्ते 11 हजार 200 दिव्यांगांना वेगवेगळी उपकरणं वाटली जाणार आहेत. तर 2200 जणांना श्रवणयंत्र आणि 1200 व्हील चेअरचं वाटप करण्यात येणार आहे.
मोदींच्या वाढदिवसाला रक्तदान शिबीर, औषधांचं वितरण, रुग्णालयात गरीब रुग्णांना मदत आणि स्वच्छता अभियान यांसारख्या कार्यक्रमांचं आयोजन केल्याचं पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांनी सांगितलं. याशिवाय 'नमो अॅप'वर एका कार्यशाळेचं आयोजन करणार आहे.
तर दुसरीकडे सूरतमध्ये एक टनापेक्षा जास्त वजनाचा आणि जगातील सर्वात उंच केक बनवण्या येणार आहे. हा केक पिरॅमिडच्या आकाराचा असणार आहे. यावेळी वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्या कामगिरीचा ठसा उमटवणाऱ्या मुलींचा सन्मानही केला जाणार आहे.