राज्यसभेच्या सहा जागांसाठी महाराष्ट्रात 11 जून रोजी निवडणूक होते आहे. काँग्रेसनं पी चिदंबरम यांना तिकीट दिलं. तर भाजपकडून तीनपैकी पीयुष गोयल यांचंच एकमेव नाव जाहीर केलं होतं. त्यामुळे मोदी महाराष्ट्रातून कुणाला राज्यसभेवर पाठवणार ही एकच चर्चा दिल्लीत सुरु होती. त्यावर अखेर पडदा पडला आहे.
यापूर्वी भाजपकडून कोल्हापूरचे संभाजीराजे छत्रपती, विनय सहस्त्रबुद्धे, दत्ता मेघे आणि विकास महात्मे यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरु होती. अखेर या सर्वांना मागे टाकत विनय सहस्त्रबुद्धे आणि विकास महात्मे यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडली.
विकास महात्मेंची सरप्राईज एण्ट्री
नागपूरचे डॉक्टर विकास महात्मे यांची सरप्राईज एण्ट्री झाली आहे. कारण डॉ. महात्मे हे गेली 2-3 वर्ष धनगर आरक्षणाच्या मुद्द्यासाठी लढत आहेत. त्यांना उमेदवारी देऊन भाजप धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर असलेली धनगर समाजाची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करत असल्याचं राजकीय जानकारांचं मत आहे.
प्रत्येक पक्षात लॉबिंग
राज्यसभा निवडणुकीच्या निमित्तानं सध्या प्रत्येकच पक्षात जोरदार लॉबिंग, शह काटशहाचं अंतर्गत राजकारण पाहायला मिळतंय. ज्या सहा जागांसाठी निवडणूक होतेय, त्यापैकी राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेल, काँग्रेसकडून पी चिदंबरम, शिवसेनेकडून संजय राऊत, भाजपकडून पीयुष गोयल यांचं नाव जाहीर करण्यात आलं. त्यानंतर प्रश्न उरला होता तो भाजपचे आणखी दोन उमेदवार कोण असणार याचा, तो आता निकाली निघाला.
काँग्रेसचं संख्याबळ
संख्याबळानुसार काँग्रेसला एकच उमेदवार राज्यसभेवर पाठवता येणार आहे. सुशीलकुमार शिंदे यांच्यासह राज्यातल्या अनेक दिग्गजांचा पत्ता कट करत हायकमांडनं मात्र चिदंबरम यांच्याच नावावर शिक्कामोर्तब केलं. चिदंबरम यांच्या नावालाही वादाची झालर आहे तरीही.
सगळ्याच पक्षांचा प्रयत्न आहे राज्यसभेची ही निवडणूक बिनविरोध करण्याचा. त्यामुळे सहा जागांसाठी सहाच उमेदवार रिंगणात येतील अशी शक्यता आहे. मोदी- शहांची जोडगोळी यावेळी महाराष्ट्रातून कुणाला संधी देणार, आणि पक्षातलं जातीय संतुलन राखण्यासाठी नेमकी काय गणितं आखणार याकडे सगळ्याचं लक्ष लागलं होतं.
प्रशांत कदम, एबीपी माझा, नवी दिल्ली