Birju Maharaj Passed Away : प्रसिद्ध कथ्थक नर्तक पंडित बिरजू महाराज यांचं निधन झालं असून वयाच्या 83 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पद्मविभूषण पुरस्कार विजेते बिरजू महाराज (83) यांनी रविवारी मध्यरात्री अखेरचा श्वास घेतला. त्यांचे नातू स्वरांश मिश्रा यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे याबाबत माहिती दिली. गायक अदनान सामीनंही सोशल मीडिया पोस्टद्वारे त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
अदनान सामीनं सोशल मीडियावर लिहिलं आहे की, "महान कथ्थक नर्तक पंडित बिरजू महाराज यांच्या निधनाच्या बातमीनं खूप दुःख झालं. आज आपण कलेच्या क्षेत्रातील एक अनोखी संस्था गमावली आहे. त्यांनी आपल्या प्रतिभेनं अनेक पिढ्यांना प्रभावित केलं आहे.
लखनौ घराण्यातील बिरजू महाराज यांचा जन्म 4 फेब्रुवारी 1938 रोजी लखनौ येथे झाला. त्यांचं खरे नाव पंडित बृजमोहन मिश्रा होतं. कथ्थक नर्तक असण्यासोबतच ते शास्त्रीय गायकही होते. बिरजू महाराज यांचे वडील आणि गुरु आच्छान महाराज, काका शंभू महाराज आणि लच्छू महाराज हे देखील प्रसिद्ध कथ्थक नर्तक होते.
देवदास, देढ इश्किया, उमराव जान आणि बाजीराव मस्तानी यांसारख्या चित्रपटांसाठी बिरजू महाराज यांनी नृत्यदिग्दर्शन केलं. याशिवाय सत्यजित रे यांच्या 'शतरंज के खिलाडी' या चित्रपटातही त्यांनी संगीत दिलं होतं. बिरजू महाराज यांना 1983 मध्ये पद्मविभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. यासोबतच त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार आणि कालिदास सन्मानही मिळाला आहे. बनारस हिंदू विद्यापीठ आणि खैरागड विद्यापीठानेही बिरजू महाराजांना मानद डॉक्टरेट बहाल केली होती.
2012 मध्ये, त्यांना विश्वरूपम चित्रपटातील नृत्य नृत्यदिग्दर्शनासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. 2016 मध्ये, बाजीराव मस्तानीच्या मोहे रंग दो लालने त्यांच्या नृत्यदिग्दर्शनासाठी फिल्मफेअर पुरस्कार जिंकला.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Arun Jakhade Passed Away : ग्रंथप्रकाशक, लेखक आणि ज्येष्ठ संपादक अरुण जाखडे यांचं निधन
- 'मेहता पब्लिशिंग हाऊस'चे सुनिल मेहता यांचे निधन, वयाच्या 56 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी एबीपी माझा लाईव्ह पाहा