रायपूर : छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त बिजापूर आणि सुकमा जिल्ह्याच्या सीमेवर झालेल्या चकमकीत 22 जवान शहीद झाले आहेत, त्यापैकी 17 जवानांचे मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. तर इतर 31 जवान जखमी झाले आहेत. यंदाच्या वर्षातील नक्षलवाद्यांचा आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला आहे. या संपूर्ण घटनेवर आसामहून रायपूरला परतल्यानंतर छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी म्हटलं की, "जवानांचं मनोधैर्य उंचावलेलं असून नक्षलविरोधी अभियान सुरुच राहिल. तसंच गुप्तचर यंत्रणेवर उपस्थित होत असलेल्या प्रश्नांवर ते म्हणाले की, बिजापूर-सुकमा एन्काऊंटर हे गुप्तचर यंत्रणेचं अपयश नाही." ते पुढे म्हणाले की, "आमचे जवान लढाईत शहीद झाले आहेत, पण त्यांनी धैर्याने लढाई लढली. मी त्यांच्या वीरमरणाला नमन करतो. नक्षलवादी आपली अखेरची लढाई लढत आहेत, लवकरच त्यांचा खात्मा केला जाईल."


"चकमक ज्या ठिकाणी झाली तो नक्षलवाद्यांचा गड समजला जोता. आम्ही तिथे सुरक्षा दलाद्वारे कॅम्प लावण्याची योजना आखली होती. जवळपास 2000 सैनिकांना त्या क्षेत्रात शिबीर लावण्यासाठी पाठवलं होतं. यामुळे नक्षलवादी चळवळीला प्रतिबंध लागणार होता, त्यामुळे ते चवताळले होते. हे कुठलंही गुप्तचर यंत्रणेचं अपयश नव्हतं. आम्ही नक्कीच तिथे पुन्हा एकदा कॅम्प लावणार आणि नक्षलविरोधी अभियान सुरु ठेवणार आहोत," असं मुख्यमंत्री भूपेश बघेल स्पष्ट केलं.


नक्षलवाद्यांचं किती नुकसान झालं?
"आम्हाला माहिती मिळाली आहे की, चार ट्रॅक्टरमधून घटनास्थळावरुन मृत आणि जखमी नक्षलवाद्यांना नेलं आहे. यावरुन तुम्ही अंदाज लावू शकता की जवानांनी त्यांचं किती नुकसान केलं आहे," असं मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी सांगितलं. "नक्षली हल्ल्यात गुप्तचर यंत्रणा अपयशी ठरल्याची शक्यता आम्ही फेटाळतो. हा पोलीस शिबिरावरील हल्ला नव्हता. आम्ही त्या परिसरात नक्षलविरोधी अभियान राबवत होतो. आम्ही सुकमा, बिजापू आणि दंतेवाडाच्या दिशेने आमच्या अभियानाअंतर्गत कॅम्प लावत होतो. नक्षलवादी आता 40X40 चौरस किमी क्षेत्रापुरते मर्यादित राहिले आहेत आणि हेच त्यांच्या निराशेचं कारण आहे आमचं अभियान थांबणार नाही. शिबीर आणि रस्ते निर्माण होतच राहणार. जवानांचं बलिदान व्यर्थ जाणार नाही," असं बघेल यांनी म्हटलं.


सीआरपीएफचे संचालक छत्तीसगडमध्ये 
सीआरपीएफचे संचालक कुलदीप सिंह यांनी नक्षलवादी हल्ल्यानंतर परिस्थितीवर नजर ठेवण्यासाठी छत्तीसगडमध्ये आहेत. या संपूर्ण अभियानात गुप्तचर यंत्रणेच्या अपयशाचा इन्कार त्यांनी केला. "जवळपास 25 ते 30 नक्षलवाद्यांचा आम्ही खात्मा केला आहे. पण नेमका आकडा अद्याप समजू शकलेला नाही," असं कुलदीप सिंह यांनी म्हटलं.