Weather Update : बिहारमध्ये (Bihar) मान्सूनने 17 वर्षांचा विक्रम मोडला आहे. राज्यात 13 जूनपासून मान्सूनच्या आगमनाचा दिवस निश्चित करण्यात आला होता. मात्र एक दिवस आधीच म्हणजे 12 जून रोजी ईशान्य बिहारमधील पाच ते सहा जिल्ह्यांमध्ये मान्सूनचे आगमन झाले आहे. मान्सूनचे आगमन होताच पूर्णिया आणि किशनगंज जिल्ह्यातही मुसळधार पाऊस सुरू झाला. यापूर्वी 2006 मध्ये 6 जूनला वेळेपूर्वीच मान्सून दाखल झाला होता.


दक्षिण बिहारमध्ये तीव्र उष्णता 


देशातील वातावरणात सातत्यानं बदल होत आहे. कुठे उन्हाचा तडाका तर कुठे पाऊस हजेरी लावत आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार यावर्षी बिहारमध्ये मान्सून एक दिवस आधीच दाखल झाला आहे. परंतू, दक्षिण बिहारमध्ये तीव्र उष्णता जाणवत आहे. काही भागात उष्णतेच्या लाटेमुळे नागरिकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. 


सहा जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा


दक्षिण बिहारमध्ये कडक उन्हामुळे लोक हैराण झाले आहेत. उत्तर बिहारमध्ये मुसळधार आणि मध्यम पाऊस पडत आहे, तर दक्षिण बिहारमध्ये उष्णतेच्या लाटेमुळे लोक हैराण झाले आहेत. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आज म्हणजेच मंगळवारी 6 जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर काही भागात विजांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला आहे. मधुबनी, किशनगंज, पूर्णिया, अररिया, सुपौल आणि भागलपूर या जिल्ह्यात पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. दरम्यान, दक्षिण बिहार आणि उत्तर पश्चिम बिहारच्या सर्व जिल्ह्यांमध्ये पुढील 5 दिवस  तापमानात 1 ते 2 अंशांनी वाढ होऊन तीव्र उष्णतेचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या भागात पुढील पाच दिवस पावसाची शक्यता नसल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.


 8 जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा


हवामान विभागानं आज बिहारमधील 8 जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. यामध्ये पश्चिम चंपारण, पूर्व चंपारण, औरंगाबाद, भोजपूर, रोहतास, शेखपुरा, नवाडा आणि गया जिल्ह्यांचा समावेश आहे. या जिल्ह्यांमध्ये तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे.  याशिवाय राजधानी पाटणा, नालंदा, वैशाली, बक्सर, जेहानाबाद आणि अरबलमध्ये तापमानात किंचित वाढ होऊन तीव्र उष्णतेचा अंदाज आहे.


8 जिल्ह्यांमध्ये 16 ठिकाणी पाऊस


सोमवारी 8 जिल्ह्यांत 16 ठिकाणी मुसळधार ते मध्यम पावसाची नोंद झाली. यापैकी पूर्णियातील धेंग्राघाट येथे 105.2 मिमी, तर पूर्णिया शहरात 25.5 मिमी, कटिहारमधील बलरामपूरमध्ये 57.2, उत्तर कटिहारमध्ये 39, बुरारी 29.6 मिमी, सिक्टी 56.4, अररिया जिल्ह्यात 46 मिमी, भार्गमामध्ये 35.6 मिमी, मध्यम पावसाची नोंद झाली आहे. भागलपूरच्या सनहौलामध्ये 33.6 मिमी, सबौरमध्ये 33.6 मिमी, पिरपेंटीमध्ये 33 मिमी, किशनगंज जिल्ह्यातील ठाकूरगंजमध्ये 34.4 मिमी, तेहदागच्छमध्ये 29.4 मिमी, चारघडियामध्ये 26 मिमी, सुपाऊलंडच्या 268 मिमीच्या त्रिवेणीगंजमध्ये 24.4 मिमी. बांका येथे 25.8 मिमी पावसाची नोंद झाली आहे.


महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन 


महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन झाले आहे. कोकणात काही भागत पाऊसही झाला आहे. इतरही भागात मान्सूनसाठी अनुकूल वातावरण निर्माण होत आहे. कोकण आणि गोवा किनारपट्टीवर चक्रीवादळामुळे समुद्र खवळला आहे. यामुळे उंचच उंच लाटा दिसत आहेत. महाराष्ट्रातील किनारपट्टी भागातही धोक्याचा इशारा देण्यात आला आहे.