Nitish Kumar : निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर (Prashant Kishore) यांची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे. प्रशांत किशोर यांनी नवीन राजकीय पक्ष काढण्याचे संकेत दिले आहेत. ते लवकरच राजकारणात सक्रिय सहभागी होणार आहेत. यासंदर्भात बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांना प्रश्न विचारण्यात आला. यावेळी नितीश कुमार यांनी त्याबाबत बोलण्यास नकार दिला. प्रशांत किशोर यांच्या भुमिकेशी आपला काहीही संबंध नसल्याचे नितीश कुमार यांनी सांगितले.
प्रशांत किशोर आणि नितीश कुमार यांच्या नात्याची नेहमीच चर्चा
मुख्यमंत्री नितीश कुमार आणि प्रशांत किशोर यांच्यात असमाऱ्या नात्याची नेहमीच बिहारमध्ये चर्चा होत असते. जेडीयूने प्रशांत किशोर यांना राजकीय व्यासपीठही दिले होते. मात्र, त्यानंतर प्रशांत आणि नितीश यांच्यातील राजकीय संबंध बिघडले आणि दोघेही वेगळे झाले. मात्र, काही महिन्यांपूर्वी ही जोडी दिल्लीत एकत्र दिसली होती. प्रशांत किशोर आणि नितीश कुमार यांनी दिल्लीत एकत्र डिनर केला होता. त्यावेळी नितीश कुमार म्हणाले होते की, प्रशांत किशोर यांच्याशी माझे वैयक्तिक संबंध आहेत, राजकीय नाहीत.
प्रशांत किशोर काँग्रेसमध्ये जाणार असल्याची चर्चा
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून प्रशांत किशोर हे काँग्रेसमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरु होती. कारण त्यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासोबत अनेकदा बैठका घेतल्या होत्या. काँग्रेसचे पुनरुज्जीवन करण्याची योजनाही त्यांनी सांगितली होती. तेव्हा ते स्वत: पक्षात प्रवेश करु शकतात, अशी चर्चा होती. मात्र काही मुद्द्यांवर एकमत न झाल्याने त्यांनी पक्षात येण्यास नकार दिला होता. त्यानंतर प्रशांत किशोर यांनी एक ट्वीट केले होते. त्याची जोरदार चर्चा झाली. आता जनतेसमोर जाण्याची वेळ आली आहे. त्याची सुरुवात बिहारपासून होईल असे प्रशांत किशोर यांनी म्हटले होते. मात्र, त्यांनी पक्ष कधी काढणार, त्यांच्या पक्षाचे नाव काय असेल, हे अद्याप स्पष्ट केलेले नाही. मात्र, सुरुवात बिहारमधून करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. बिहारमधूनच नवीन 'जन सूरज' मोहीम सुरु करण्याची घोषणाही त्यांनी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या: