Lalu Prasad on PM Modi : बिहारमध्ये नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी राजकीय भूकंप घडवून आणल्यानंतर वेगाने घडामोडी घडत आहेत. नितीश कुमार यांनी भाजपला धक्का देत राष्ट्रीय जनता दलासोबत सत्ता स्थापन केली. नितीश कुमार यांनी मुख्यमंत्री पदाची तर तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. सत्ता स्थापन केल्यानंतर प्रथमच नितीश कुमार यांनी लालूप्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी लालूप्रसाद यादव यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. देशात हुकूमशाही सरकार नको आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सत्तेतून हटवावं लागेल असे वक्तव्य लालूप्रसाद यादव यांनी केलं आहे.


बिहारमध्ये नितीश कुमार यांचा पक्ष जनता दल आणि लालूप्रसाद यादव यांचा पक्ष राष्ट्रीय जनता दल यांनी सरकार स्थापन केली आहे. यानंतर प्रथमच लालूप्रसाद यादव यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. लालूप्रसाद यादव यांनी हे हुकूमशाही केंद्र सरकार असल्याचा आरोप केला आहे. केंद्र सरकारवर टीका करताना लालूप्रसाद यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना सत्तेवरून हटवायला हवे, असेही सांगितले. लालूप्रसाद यादव यांनी प्रसारमाध्यमांनी 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकांबद्दल प्रश्न विचारला होता. या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी केंद्र सरकरावर निशाणा साधला.






 


नितीश कुमार आणि लालू प्रसाद यांची भेट


लालू प्रसाद यादव बुधवारी दिल्लीहून पाटण्यात परतले. राज्यात नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्यांदाच बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी त्यांची भेट घेतली. नितीश कुमार यांनी भाजपसोबतची युती तोडून नवीन महाआघाडीचे सरकार स्थापन केले आहे. बिहारचे उपमुख्यमंत्री आणि लालूप्रसाद यादव यांचे पुत्र तेजस्वी यांनी दोन्ही नेत्यांमधील भेटीचे फोटो ट्विटरवर शेअर केले आहेत. तेजस्वी यांनी आपल्या ट्विटमध्ये, आदरणीय मुख्यमंत्री नितीश कुमार जी राष्ट्रीय अध्यक्ष (RJD) लालूप्रसाद यादव यांना भेटण्यासाठी पोहोचले. यावेळी तेज प्रताप यादव आणि राबडी देवी देखील उपस्थित होत्या, असे ट्वीट त्यांनी केले आहे.




नितीश कुमारांच्या निर्णयाचे लालू प्रसाद यादवांनी केलं कौतुक 


बिहारमध्ये मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यापूर्वीच नितीश कुमार यांनी आरजेडी सुप्रीमो लालू प्रसाद यादव यांच्याशी बोलून राजकीय घडामोडींवर चर्चा केली होती. नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांनी 10 ऑगस्ट रोजी शपथ घेतली होती. यापूर्वी जेव्हा नितीश कुमार यांनी भाजपसोबतची युती तोडली तेव्हा लालू प्रसाद यादव यांनी एनडीएपासून फारकत घेऊन राज्यात नवीन सरकार स्थापन करण्याच्या निर्णयाबद्दल नितीश कुमार यांचे कौतुक केले होते.


महत्त्वाच्या बातम्या: