Congress On Bihar Politics : बिहारमध्ये राजकीय उलथापालथींना (Bihar Politics) वेग आला असताना दुसरीकडे विरोधकांच्या इंडिया आघाडीतील प्रमुख राजकीय पक्ष असलेल्या काँग्रेसची प्रतिक्रिया समोर आली आहे. काँग्रेसचे महासचिव आणि माध्यम प्रमुख जयराम रमेश (Jairam Ramesh) यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार (Nitishkumar) यांच्याशी संवाद साधण्याचा अनेकदा प्रयत्न केला. मात्र, नितीशकुमार प्रचंड व्यस्त असल्याने दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होऊ शकली नाही. रमेश यांनी केलेल्या वक्तव्यामुळे नितीशकुमार हे भाजपसोबत घरोबा करणार असल्याच्या चर्चेला बळ मिळाले आहे.
माध्यमांशी संवाद साधताना जयराम रमेश यांनी म्हटले की, बिहारमधून काही वक्तव्ये, वृत्त समोर येत आहे. या वृ्त्तांनुसार, नवीन मंत्रिमंडळ स्थापन होणार आहे. काँग्रेसने छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना वरिष्ठ पर्यवेक्षक म्हणून बिहारमध्ये पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. आज, शनिवारपर्यंत रात्रीच्या सुमारास ते पाटण्यात दाखल होतील, अशी माहिती रमेश यांनी दिली.
नितीशकुमार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न
जयराम रमेश यांनी सांगितले की, ते कोणत्याही खात्री नसलेल्या वृत्तावर भाष्य करणार नाहीत. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हे नितीशकुमार यांच्याशी संपर्क करण्याच्या प्रयत्नात आहेत. इंडिया आघाडीला मजबूत करणे ही सर्वच पक्षांची जबाबदारी असून काँग्रेस यासाठी प्रयत्न करत असल्याचे त्यांनी म्हटले.
जयराम रमेश यांनी म्हटले की, 23 जून 2023 रोजी पाटणा येथे विरोधी पक्षनेत्यांची पहिली बैठक झाली होती.बिहारचे मुख्यमंत्री या बैठकीचे यजमान होते. दुसरी बैठक बेंगळुरूमध्ये पार पडली. त्याठिकाणी विरोधकांच्या आघाडीने आपल्या आघाडीचे नाव 'इंडिया' ठेवले. त्या बैठकीत नितीश कुमार यांची भूमिका खूप महत्त्वाची होती,असेही रमेश यांनी म्हटले.
ही राष्ट्रीय आघाडी आहे...
जयराम रमेश यांनी म्हटले की, राज्य पातळीवर आम्हाला अनेक अडचणींना सामना करावा लागू शकतो. मात्र, या आघाडीच्या शिल्पकारांपैकी नितीशकुमार हे एक शिल्पकार आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीदेखील या आघाडीच्या शिल्पकारांपैकी एक आहेत. ही आघाडी राष्ट्रीय आघाडी आहे. त्यामुळे स्थानिक मुद्यांपेक्षा राष्ट्रीय मुद्यांना प्राथमिकता दिली जात असल्याचे त्यांनी म्हटले.
भाजपचा पराभव हेच लक्ष्य
रमेश यांनी म्हटले की, काँग्रेस आणि इंडिया आघाडीची प्राथमिकता ही भाजपचा पराभव करणे ही आहे. पश्चिम बंगालमध्ये भारत जोडो न्याय यात्रा पुन्हा सुरू होणार आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री या यात्रेत सहभागी झाल्यास आम्हाला आनंद होईल असेही रमेश यांनी म्हटले.