कारण लालूप्रसाद यांचे चिरंजीव तेजस्वी यादव यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपाचं कारण पुढे करत नितीश कुमारांनी राजीनामा दिला. त्यानंतर गगन ठेंगणं झालेल्या भाजपने सूत्र हालवत नितीश कुमार यांना पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे बिहारमध्ये नितीश-मोदी पर्वाचा मार्ग मोकळा झाला आहे.
नितीश कुमार राजीनाम्याची माहिती देत असताना मोदींचं ट्वीट
नितीश कुमार राज्यपालांकडे राजीनामा देऊन बाहेर आले. माध्यमांना राजीनामा का दिला, याची माहिती देत असतानाच काही क्षणातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचं अभिनंदन केलं. राजकीय मतभेद बाजूला ठेवून भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर एकत्र आल्याबद्दल मोदींनी नितीश कुमार यांना शुभेच्छा दिल्या.
मोदी काय म्हणाले?
भ्रष्टाचाराविरोधातील लढाईत सहभागी झाल्याबद्दल नितीश कुमार यांचं अभिनंदन. देशाच्या आणि विशेषतः बिहारच्या उज्ज्वल भविष्यासाठी राजकीय मतभेद बाजूला ठेवून भ्रष्टाचाराविरोधात एकत्र येऊन लढणं काळाची गरज आहे, असं ट्वीट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं.
नितीश कुमारांकडून मोदींचे आभार
एकीकडे मोदींनी नितीश कुमार यांचे आभार मानल्याची चर्चा सुरु असतानाच नितीश कुमार यांनी मोदींना धन्यवाद म्हटलं. राजीनाम्याच्या निर्णयाचं स्वागत केल्याबद्दल मी मोदींना मनापासून धन्यवाद देतो, असं ट्वीट नितीश कुमार यांनी केलं.
नितीश कुमारांचा राजीनामा पूर्वनियोजित : लालूप्रसाद यादव
नितीश कुमार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राज्यपालांची भेट घेऊन नितीश कुमार यांनी राजीनामा सुपूर्द केला. मात्र नितीश कुमार यांच्या राजीनाम्यानंतर राजदचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांनी पत्रकार परिषद घेऊऩ नितीश कुमारांचा राजीनामा पूर्वनियोजित असून त्यांच्यावरील आरोपांमुळे आपल्या पदाचा राजीनामा दिल्याचं म्हटलं आहे. तसंच देशातील अन्य कोणत्याही मुख्यमंत्र्यावर इतक्या गंभीर स्वरुपाचे आरोप नसल्याचंही लालूप्रसाद यादव यांनी म्हटलं आहे. त्यामुळे भाजपसोबत सेटिंग करत नितीश कुमारांनी राजीनामा दिल्याचा आरोपही लालूप्रसाद यादव यांनी केला.
नितीश कुमार यांची पहिली प्रतिक्रिया
मी कुणाला राजीनामा मागितला नाही. लालू प्रसाद यादव आणि तेजस्वी यादव यांना त्यांच्यावर लावण्यात येत असलेल्या आरोपांवर स्पष्टीकरण देण्याची मागणी केली होती. मात्र असं काहीही झालं नाही. अशी परिस्थिती झाली की मी त्यामध्ये कामच करु शकत नव्हतो. त्यामुळे राजीनामा देण्याचा निर्णय घेतला, अशी प्रतिक्रिया नितीश कुमार यांनी राज्यपालांच्या भेटीनंतर दिली.
लालू प्रसाद यादव यांच्यावर होत असलेल्या सीबीआयच्या छापेमारीनंतर आणि अघोषित संपत्तीच्या कारवाईनंतर नितीश कुमार यांनी हा निर्णय घेतला.
बिहारमध्ये महायुतीचं सरकार आहे. ज्यामध्ये काँग्रेसही मित्र पक्ष आहे. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याशीही चर्चा केली. मात्र काहीही तोडगा निघाला नाही, अशी माहिती नितीश कुमार यांनी दिली.
संबंधित बातमी :