Bihar Election 2020 Exit Poll Results : बिहारच्या निवडणुकांचा शेवटचा टप्पा पूर्ण झाला आहे. अंतिम आणि तिसऱ्या टप्प्यातील मतदानानंतर बिहारच्या जनतेनं बिहारची गादी कोणाची, याचा निर्णय घेतला आहे. बिहार विधानसभा निवडणुकांचा निकाल 10 नोव्हेंबर रोजी लागणार आहे. पण त्याआधी एबीपी-सी-वोटरचा एग्जिट पोल समोर आला आहे. त्यावरून अंदाज लावला जाऊ शकतो की, पुढील पाच वर्षांसाठी बिहारमध्ये जनता कोणाची निवड करु शकते.


एबीपी-सी-वोटरच्या एग्जिट पोलमध्ये एनडीला 104-128 जागा मिळालेल्या दिसत आहेत. तर महागठबंधनला 108-131 जागांवर विजय मिळण्याची शक्यता आहे. याव्यतिरिक्त चिराग पासवान यांच्या एलजेपीला केवळ 1 ते 3 जागांवरच विजय मिळण्याची शक्यता आहे. तसेच इतरांच्या पारड्यात 4 ते 8 जागा जाण्याची शक्यता आहे.


पाहा व्हिडीओ : एक्झिट पोलमध्ये नितीशकुमार यांचा मार्ग खडतर, तेजस्वी कमाल करणार! काय सांगतात आकडे?



जाणून घ्या गठबंधनमध्ये कोणाला किती जागा मिळू शकतात?


एबीपी न्यूज-सी-वोटरच्या एग्जिट पोलनुसार, एनडीएमध्ये नीतीश कुमार यांच्या जेडीयूला 38 ते 46 जागा मिळाल्या आहेत. तसेच बीजेपीला 66 ते 74 जागा मिळू शकतात, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. व्हीआयपीला 0-4 जागा आणि हमला 0-4 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.


याव्यतिरिक्त महागठबंधनचं पाहिलं तर आरजेडीला 81-89 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आणि काँग्रेसला 21 ते 39 जागा मिळू शकतात. याव्यतिरिक्त डाव्या पक्षांना 6 ते 13 जागांवर विजय मिळण्याचा अंदाज आहे.


बिहार निवडणुकीच्या खास गोष्टी :


यंदाच्या विधानसभा निवडणुकांमध्ये सत्ताधारी गठबंधन एनडीएने पुन्हा एकदा सत्ता काबीज करण्यासाठी संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. यामध्ये नीतीश कुमार यांच्या जेडीयूने 115 जागांवर भाजपने 110, विकासशील इन्सान पार्टीने 11 आणि जीतनराम मांझी यांच्या हम (हिंदुस्थानी अवाम मोर्चा)ने 7 जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत.


परंतु, यंदाच्या वेळी बिहार निवडणुकीत लोजपाची साथ एनडीएला मिळालेली नाही. एलजेपीचे प्रमुख चिराग पासवान यांनी वेगळा मार्ग निवडत एकट्याने निवडणुक लढण्याचा निर्णय घेतला आहे. जेडीयूच्या कामामुळे असंतुष्ट असल्याचा हवाला देत लोक जनशक्ती पार्टीने यंदाच्या निवडणुकांमध्ये एकट्याने लढण्याचा निर्णय घेतला आहे.


महागठबंधनमध्ये आरजेडी (राष्ट्रीय जनता दल) 144 जागांवर निवडणूक लढणार आहे. यांच्यासोबत काँग्रेस 70 जागांवर लढत आहे. CPI-(एमएल) 19 जागांवर, सीरीआय 6 जागांवर आणि सीपीआय एम 4 जागांवर निवडणूक लढत आहे.


पाहा व्हिडीओ : बिहारमध्ये नितीश कुमार, भाजपला मोठा धक्का? काय म्हणतायत Bihar Election Exit Poll चे आकडे



गेल्या निवडणुकांमध्ये काय होती परिस्थिती?


गेल्या निवडणुकांमध्ये महागठबंधनने 178 जागांवर विजय मिळवत बहुमत मिळवलं होतं. तसेच एनडीएला केवळ 58 जागा मिळाल्या होत्या. 2015 मध्ये महागठबंधनच्या वतीने नीतीश कुमार मुख्यमंत्री बनले होते. कारण त्यावेळी जेडीयू-आरजेडी आणि काँग्रेस एकत्रपणे निवडणूक लढले होते. दरम्यान, 2017 मध्ये नीतीश कुमार यांनी महागठबंधनची साथ सोडत एनडीएमध्ये प्रवेश केला होता.


243 सदस्यांच्या बिहार विधानसभेत जवळपास 7.30 कोटी मतदारांना सरकार निवडण्याची संधी दिली आहे. यामध्ये जवळपास 78 लाख युवा वोटर्स आहेत. ज्यांनी पहिल्यांदाच आपला मताधिकार बजावला आहे.