Bihar Caste Survey Result : बिहार सरकारने जातीनिहाय गणनेची (Bihar Caste Census Result) आकडेवारी जाहीर केली आहे. देशात प्रथमच एखाद्या राज्याकडून अशी जातनिहाय जनगणना जाहीर केली आहे. बिहार सरकारनं जातीय जनगणनेचे आकडे जाहीर केले आहेत. बिहारमध्ये ओबीसींची लोकसंख्या 63 टक्के आहे. 27 टक्के लोकसंख्या मागास, तर 36 टक्के अतिमागास आहे. दलितांची संख्या 19 टक्के तर अनुसूचित जमातींची संख्या केवळ 2 टक्के एवढी आहे. सरकारच्या जातीय जनगणनेच्या निर्णयानं बिहारमध्ये पुन्हा एकदा मंडल राजकारणाची एन्ट्री झाल्याचं बोललं जातं आहे. महाराष्ट्रासह देशातल्या अनेक राज्यांमध्ये जातीय जनगणनेची मागणी होत आहे.
बिहार सरकारकडून जातीनिहाय गणनेचे आकडे जारी
बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी मास्टरस्ट्रोक मारला आहे. बिहार सरकारकडून जातीय जनगणनेची आकडेवारी जारी करण्यात आली आहे. बिहार सरकारने सोमवारी पत्रकार परिषदेत जातीनिहाय जनगणनेची आकडेवारी जाहीर केली आहे. बिहारचे मुख्य सचिव आणि इतर अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जातीय जनगणनेचं काम पूर्ण झालं आहे.
नितीश कुमार यांचा मास्टरस्ट्रोक
सरकारने जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, बिहारमध्ये 13 कोटी लोकसंख्या आहे. यामध्ये सर्वाधिक हिंदू 81.9 टक्के आहेत. तर मुस्लिम 17.7 टक्के, ख्रिश्चन 0.05 टक्के, शिख 0.01 टक्के, बौद्ध 0.08 टक्के, जैन 0.0096 टक्के आणि अन्य धर्मीय 0.12 टक्के आहेत.
अनुसूचित जमातीची म्हणजे एसटी प्रवर्गाची लोकसंख्या 1.68 टक्के आहे. बिहारमध्ये अनारक्षित सर्वसाधारण लोकसंख्या 15.52 टक्के आहे. ब्राह्मणांची लोकसंख्या 3.66 टक्के आहे. बिहारमधील भूमिहीन लोकसंख्या 2.86 टक्के आहे. बिहारमध्ये यादवांची लोकसंख्या 14 टक्के तर, कुर्मी समाजाची लोकसंख्या 2.87 टक्के आहे. मुसहरची लोकसंख्या 40 टक्के आहे.
जातनिहाय गणनेची आकडेवारी
- मागास वर्ग - 27.1286 टक्के (लोकसंख्या - 35463936)
- अति मागास वर्ग - 36.0148 टक्के (लोकसंख्या - 47080514)
- अनुसूचित जाती - 16.6518 टक्के (लोकसंख्या - 25689820)
- अनुसूचित जमाती - 1.6824 टक्के (लोकसंख्या - 2199361)
- अनारक्षित - 15.5224 टक्के (लोकसंख्या - 20291679)
- एकूण लोकसंख्या -130725310
मुख्यमंत्री नितीश यांच्याकडून अभिनंदन
आकडेवारी जाहीर झाल्यानंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी ट्विट करून गणना करणाऱ्या संपूर्ण टीमचे अभिनंदन केलं आहे. जातनिहाय गणनेचा प्रस्ताव विधिमंडळात एकमताने मंजूर करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं आहे. राज्य सरकार जात आधारित जनगणना करेल, हा निर्णय बिहार विधानसभेच्या सर्व 9 पक्षांच्या संमतीने घेण्यात आला. 2 जून 2022 रोजी याला मान्यता मिळाली. या आधारे राज्य सरकारने स्वत:च्या संसाधनातून जातनिहाय गणना केली आहे. जातीवर आधारित जनगणनेने केवळ जातीच उघड केल्या नाहीत तर प्रत्येकाच्या आर्थिक स्थितीचीही माहिती दिली आहे. त्या आधारे सर्व घटकांच्या विकास आणि उन्नतीसाठी पुढील कार्य केलं जाईल.
धर्मावर आधारित लोकसंख्या
- हिंदू - 81.99 टक्के (लोकसंख्या - 107192958)
- इस्लाम - 17.70 टक्के (लोकसंख्या - 23149925)
- ईसाई - 0.05 टक्के (लोकसंख्या - 75238)
- सिख - 0.011 टक्के (लोकसंख्या - 14753)
- बौद्ध - 0.0851 टक्के (लोकसंख्या - 111201)
- जैन - 0.0096 टक्के (लोकसंख्या - 12523)
- इतर धर्म - 0.1274 टक्के (लोकसंख्या - 166566)
- कोणताही धर्म नाही - 0.0016 टक्के (लोकसंख्या - 2146)