Continues below advertisement


Bihar Assembly Elections 2025 : देशाचं लक्ष लागून असलेल्या बिहार विधानसभेच्या निवडणुकीपूर्वीचा (Bihar Election 2025) सी व्होटर सर्व्हे (C Voter Sutvey) समोर आला आहे. सी वोटरने सप्टेंबर महिन्याचे आकडेवारी जाहीर केली आहे. या ट्रॅकरमध्ये बिहारच्या मुख्यमंत्री पदासाठी संभाव्य चेहऱ्यांची लोकप्रियता स्पष्टपणे दिसून आली आहे. सी वोटरच्या ताज्या ट्रॅकरनुसार, आरजेडीचे नेते तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) आणि जन सुराज अभियानाचे प्रमुख प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांची रेटिंग वाढली आहे.


बिहार विधानसभा निवडणूक जवळ येत असताना राजकीय हालचालींना गती मिळाल्याचं दिसून येत आहे. एकीकडे एनडीएच्या माध्यमातून भाजप आणि नितीश कुमार यांनी पुन्हा सत्ता आणण्यासाठी कंबर कसली आहे. तर दुसरीकडे त्यांच्यासमोर तेजस्वी यादव आणि जन सुराज अभियानचे प्रमुख प्रशांत किशोर यांनी मोठं आव्हान उभं केलं आहे.


Bihar C Voter Survey : तेजस्वी यादव आणि प्रशांत किशोरांची वाढती ताकद


सी व्होटर सर्व्हे डेटानुसार, तेजस्वी यादव यांची लोकप्रियता 35 टक्क्यांवर पोहोचली आहे. फेब्रुवारीपासून ते सतत पहिल्या क्रमांकावर होते. मात्र जून, जुलै आणि ऑगस्टमध्ये त्यांची रेटिंग काहीशी घसरली होती. आता पुन्हा एकदा ती वर चढताना दिसत आहे. दुसरीकडे, प्रशांत किशोर यांनी 23 टक्के रेटिंग मिळवत नवा विक्रम केला आहे. त्यांचा आक्रमक प्रचार, विशेषतः भाजपाविरोधी भूमिका, या वाढीचे प्रमुख कारण मानले जात आहे.


Bihar Election News : नीतीश कुमार आणि एनडीएसमोरील आव्हान


सी वोटर ट्रॅकरनुसार मुख्यमंत्री नीतीश कुमार (Nitish Kumar) यांची रेटिंग 16 टक्क्यांवर नोंदली गेली आहे. तर एनडीएचे सम्राट चौधरी (Samrat Choudhary) यांची लोकप्रियता घसरून 6.5 टक्क्यांवर आली आहे. प्रशांत किशोर यांचा प्रचार एनडीएच्या मतदारांवर परिणाम करत असून त्याचा थेट फायदा तेजस्वी यादव यांना होत असल्याचं मत या सर्व्हेमध्ये व्यक्त करण्यात आलं आहे.


Bihar Politics : निवडणुकीतील समीकरणे आणि मतांचे गणित


सी व्होटर सर्व्हे हा थेट मतशेअर दाखवत नसला तरी त्यातून मिळालेला संदेश स्पष्ट आहे. तेजस्वी यादव आणि प्रशांत किशोर यांचे मोमेंटम वाढत आहे. जर ही रेटिंग प्रत्यक्ष मतांमध्ये रुपांतरित झाली, तर या दोघांना मोठा फायदा मिळू शकतो. प्रशांत किशोर यांना सध्या अंदाजे 8 ते 10 टक्के मतशेअर मिळेल असे गृहित आहे, पण त्यांना किंगमेकर बनण्यासाठी किमान 25 टक्के मतशेअर आवश्यक आहे.


Bihar Election News : महिला मतदारांचे समीकरण


सी व्होटर सर्व्हेचे प्रमुख यशवंत देशमुख यांच्या मते, नीतीश कुमार यांच्या महिला केंद्रित योजनांचा प्रभाव आजही कायम आहे. सायकल योजना (Cycle Scheme) आणि महिला रोजगार योजना (Women Employment Scheme) यामुळे महिलांमध्ये त्यांच्यावरील विश्वास टिकून आहे, ज्यामुळे त्यांच्या मतदारआधाराला मजबुती मिळू शकते.


C Voter Survey : पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधींची लोकप्रियता


सी वोटर ट्रॅकरनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची लोकप्रियता 57 टक्क्यांवरून घसरून 51 टक्क्यांवर आली आहे. दुसरीकडे, राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची रेटिंग 35 टक्क्यांवरून 41 टक्क्यांवर गेली आहे. यामुळे दोघांमधील अंतर केवळ 10 टक्के इतके राहिले आहे. हा बदल काँग्रेससाठी सकारात्मक तर एनडीएसाठी चिंताजनक संकेत मानला जात आहे.


यशवंत देशमुख यांनी सांगितले की राहुल गांधी परदेश दौर्‍यावर असल्याने त्यांचा प्रचार थांबलेला आहे. तर एनडीए महिलांसाठी नव्या योजनांवर लक्ष केंद्रीत करत आहे. त्याचा परिणाम पुढील काही आठवड्यांत रेटिंगमध्ये दिसू शकतो.



ही बातमी वाचा: