4 हजार कोटी महसुलावर पाणी, बिहारमध्ये दारुबंदी
एबीपी माझा वेब टीम | 05 Apr 2016 09:36 AM (IST)
पाटणा: निवडणुकीत दिलेल्या आश्वासनाला जागत बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार सरकारने सर्व प्रकारच्या दारुवर बंदी घातली आहे. आज नव्याने जाहीर करण्यात आलेल्या निर्णयात देशी आणि विदेशी अशा दोन्ही प्रकारच्या दारुवर बिहारमध्ये बंदी घालण्यात आली. बिहार सरकारच्या कॅबिनेटमध्ये हा मोठा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे बिहार सरकारचा सुमारे 4 हजार कोटींचा महसूल बुडणार असला, तरीही नितीश कुमार यांनी हा धाडसी निर्णय घेतला आहे. यामुळे बिहारच्या कोणत्याही पंचतारांकीत हॉटेलमध्ये आता दारु मिळणार नाही. याआधी बिहार सरकारने केवळ देशी दारुवर बंदी घातली होती. दरम्यान, दारुबंदी करणारं बिहार हे देशात चौथं राज्य ठरलं आहे. यापूर्वी गुजरात, केरळ आणि नागालँडमध्येही दारुबंदी करण्यात आली आहे.