Continues below advertisement

बिहार विधानसभा निवडणूक अगदी तोंडावर येऊ घातली आहे. यामुळे महागठबंधन आणि एनडीए आघाडीमधील राजकीय वातावरण तापू लागले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विकासकामांच्या निमित्ताने सततचा होणारा दौरा, मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे पुढील पाच वर्षात 1 कोटी युवकांना रोजगार देण्याचे आश्वासन, काँग्रेसचे नेते राहुल गांधी व आरजेडी नेते तेजस्वी यादव यांची "मतदार अधिकार यात्रा" व त्यानिमित्ताने चर्चिला जाणारा ‘वोटचोरी’चा मुद्दा आणि बहुचर्चित असलेले जन सुराज पार्टीचे सर्वेसर्वा प्रशांत किशोर यांची "बिहार बदलाव यात्रा" यामुळे बिहारचे राजकारण घुसळून निघत आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याविरुद्ध असलेली अँटीइन्कबन्सी जोर धरण्याची असलेली शक्यता, प्रशांत किशोर हे कोणत्या जातीचे उमदेवार निवडणुकीच्या रिंगणात उभे करतील यावर अवलंबून असलेली शक्यता आणि ‘एसआयआर’ प्रक्रियेचा नागरिकांवर कितपत नकारात्मक परिणाम होईल, यावर बिहारचा निकाल अवलंबून आहे. या अनुषंगाने बिहारमधील राजकीय सद्यस्थितीचा ‘रुद्र रिसर्च अँड एनालिटीक्स’ या संस्थेने ग्राउंडवर जाऊन आढावा घेतला आहे.

निवडणूक आयोगाची एसआयआर प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात

Continues below advertisement

जून 2025 मध्ये निवडणूक आयोगाने बिहारमध्ये SIR (Special Intensive Revision) प्रक्रिया सुरू केली. ही प्रक्रिया 24 जून ते 25 जुलै 2025 दरम्यान चालली, ज्यामध्ये 7 कोटी 24 लाख फॉर्म जमा झाले. 1 ऑगस्ट रोजी मसुदा मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आल्यानंतर मतदार यांद्यामधील घोळ विरोधी पक्षाच्या वतीने समोर आणण्यात येत आहे. महगठबंधनच्या वतीने मुस्लीम आणि गरिब मतदारांना यादीतून वगळण्याचे कारस्थान असल्याचा थेट आरोप केला आहे. याला उत्तर म्हणून राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वात महागठबंधनच्या वतीने "मतदार अधिकार यात्रा" सुरू करण्यात आली आहे. जिवंत असलेल्या मतदारांना मृत ठरवल्यामुळे विरोध पक्षाच्या वतीने बिहार आणि केंद्रातील सरकारने गडबड केल्याचे नॅरेटिव्ह पसरवण्यात येत आहे. यासंदर्भात आमच्या टिमने बिहारच्या नागरिकांसोबत केलेल्या चर्चेतून दिसून आले की, लोकांमध्ये एसआयआरबद्दल शंका निर्माण होत आहे. त्यांच्यामध्ये या प्रक्रियेबाबत नाराजी दिसून येत आहे.

राहुल गांधींची "वोटर अधिकार यात्रा" आणि ‘वोटचोरी’चे नॅरेटिव्ह

राहुल गांधींच्या नेतृत्त्वातील "मतदार अधिकार यात्रा" 17 ऑगस्ट रोजी सासाराम येथून सुरू झाली. ही यात्रा 16 दिवस सुरु होती. 1 सप्टेंबर रोजी पाटणा येथे यात्रेचा समारोप झाला आहे. यात्रेदरम्यान सुमारे 1300 किमीचा प्रवास आणि 200 हून अधिक विधानसभा मतदारसंघांचा दौरा करण्यात आला आहे. यात्रेत आरजेडीचे नेते तेजस्वी यादव, सीपीआयएमलचे नेते दीपांकर भट्टाचार्य, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष राजेश राम, व्हीआयपीचे नेते मुकेश साहनी, खासदार पप्पू यादव हे प्रमुख चेहरे सहभागी आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी मांडत असलेल्या ‘वोटचोरी’च्या मुद्द्यामुळे नागरिकांमध्ये सरकारबद्दल नकारात्मकता निर्माण होत असल्याचे आम्हाला दिसून आले. रोहतास, औरंगाबाद, नवादा, गया, मुंगेर, भागलपूर, कटिहार, पूर्णिया, अररिया, सुपोल, दरभंगा, सीतामढी, मुझफ्फरपूर, पूर्व आणि पश्चिम चंपारण या जिल्ह्यामध्ये महागठबंधनमधील काँग्रेस आणि आरजेडीचे याआधी आमदार जिंकून आलेले आहेत. या ठिकाणी पुन्हा मोठ्या प्रमाणात मतांची टक्केवारी वाढावी म्हणून या भागातून यात्रेचे नियोजन केल्याचे दिसून येते.

भाजपमध्ये इनकमिंग सुरू

अलीकडच्या काळात माजी केंद्रीय मंत्री नागमणी, बिहार सरकारच्या माजी मंत्री सुचित्रा सिन्हा, माजी आयपीएस अधिकारी आनंद मिश्रा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. 17 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गया येथील सभेत आरजेडीचे नवादा येथील आमदार विभा देवी (राजवल्लभ यादव यांची पत्नी) आणि रजौली येथील आमदार प्रकाश वीर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यामुळे एनडीएची ताकद आणखी वाढली असल्याचे दिसून येते.

जातीय कल

यादव व मुस्लीम मतदार आरजेडीची मुख्य ताकद असून मल्लाह समाजातील मतदार महागठबंधनमधील व्हीआयपी पक्षाकडे झुकल्याचे दिसून येते. काही दलित समाजामध्ये आरजेडी व काँग्रेसचा प्रभाव दिसून येतो. काँग्रेसने रविदास समाजातून राजेश कुमार यांना प्रदेशाध्यक्ष केल्याने काँग्रेसला दलित मते मिळण्याची शक्यता वाढली आहे. भूमिहार, राजपूत आणि ब्राम्हण मतदारांचा अधिक कल भाजपच्या बाजूने दिसून आला. सवर्ण, कुशवाहा (कोयरी, कुर्मी), इतर ओबीसी, पासवानमांझी समाजातील मतदारांची एनडीएला अधिक पसंत मिळत असल्याचे दिसून येते. चिराग पासवानजीतन राम मांझी यांच्यामुळे पासवान आणि मांझी मतदार एनडीएला पाठिंबा देताना दिसून आले. अशाप्रकारे आमच्या टिमने ग्राउंडवर जाऊन विविध समाजातील मतदारांशी केलेल्या संवादातून जातीय कल जाणून घेतला. यामध्ये महागठबंधनच्या तुलनेत एनडीएला मिळणारा पाठिंबा अधिक दिसून आला.

मुख्यमंत्रीपदासाठी तेजस्वी यादव अधिक लोकप्रिय

आजही मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून आरजेडीचे नेते तेजस्वी यादव यांना मतदारांचे अधिक प्राधान्य मिळत असल्याचे त्यांच्यासोबत केलेल्या चर्चेतून दिसून आले. विशेषत: युवा वर्गामध्ये त्यांची असलेली क्रेझ, जनसंपर्क, यादव व मुस्लिम समाजावरील अधिकचा प्रभाव, बेरोजगारीस्थलांतराविरोधातील लढा, उपमुख्यमंत्रिपदाची कामगिरी आणि विरोधी पक्षाच्या नेता म्हणून असलेली कामगिरी त्यामुळे त्यांची लोकप्रियता वाढल्याचे दिसून आले.

लोजपा (रामविलास) नेते चिराग पासवान यांचे घुमजाव

जुलै 2025 मध्ये चिराग पासवान यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली, ज्यात ते सारण किंवा इतर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी करू शकतात. त्यांनी "बिहार फर्स्ट, बिहारी फर्स्ट" ही घोषणा दिली आहे. त्यांनी सुरुवातीला एनडीएला बळकट करण्याचा दावा करत विधानसभेच्या सर्व 243 जागांवर उमेदवार उभे करण्याची घोषणा केली होती, त्यामुळे एनडीएमध्ये तणाव निर्माण झाला होता. मात्र, त्यांनी 15 ऑगस्टला स्पष्ट केले की, "जोपर्यंत मोदीजी आहेत, तोपर्यंत एनडीए सोडण्याचा प्रश्नच नाही." बिहारमधील राजकीय विश्लेषकांशी चर्चा केली असता, त्यांनी सांगितले की एलजेपीला 45 पेक्षा अधिक जागा हव्या आहेत. त्यामुळे चिराग पासवान एनडीवर दबाव आणण्यासाठी वेगळी चूल उभा करण्याची भाषा करत आहेत.

प्रशांत किशोर यांच्या जनसुराज पार्टीला वाढता पाठिंबा

बिहारमध्ये गेल्या तीन वर्षांपूर्वी प्रशांत किशोर यांनी ‘जन सुराज यात्रा’ सुरू केली. यामाध्यमातून त्यांनी 3 हजार किमीचा प्रवास पूर्ण केला. त्यानंतर मे 2025 प्रशांत किशोर यांनी जन सुराज पार्टीच्या वतीने 'बिहार बदलाव यात्रा' बिहारमध्ये राजकीय आणि सामाजिक बदल घडवण्यासाठी सुरू केली आहे. यामाध्यमातून ते लोकांना शिक्षण, रोजगार, स्थलांतर थांबवणे, राज्यातील वाढती गुन्हेगारी, वाळूचोरी आणि दारूबंदी हटवण्यासारखे मुद्दे पटवून देत आहेत. सोबतच जाती आधारित राजकारण करत नसल्यामुळे आणि सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांवर थेट टिका करत असल्यामुळे सुशिक्षित मतदारांपुढे नवीन पर्याय निर्माण झाल्याचे दिसून येते. राज्यातील युवा आणि महिला मतदारांमध्ये प्रशांत किशोर यांची लोकप्रियता वाढत असल्याचे लोकांसोबत केलेल्या चर्चेतून जाणवले.

जेडीयूचे मजबूत जातीय समीकरण आणि नितीश कुमारांची सुशासन बाबू असलेली प्रतिमा

मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी महिलांसाठी आणलेल्या विविध योजना, "सुशासन बाबू" म्हणून निर्माण झालेली प्रतिमा आणि दारूबंदीच्या निर्णयामुळे महिला मतदारांचा कल जेडीयूच्या बाजूने अधिक प्रमाणात दिसून येतो. नितीश कुमार हे बिहारमधील अत्यंत मागासवर्गीयांचे नेते मानले जातात. त्यामुळे सद्यस्थितीला एनडीए आघाडीला नितीश कुमार यांच्याशिवाय पर्याय नाही. भाजपने नितीश कुमार यांच्याच जातीतील सम्राट चौधरी यांना राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून नियुक्त केले आहे. परंतु, मागासवर्गीयांची मते जोपर्यंत नितीश कुमार एनडीएसोबत आहेत तोपर्यंतच भाजपकडे राहतील असे बिहारमधील राजकीय जाणकरांसोबत केलेल्या चर्चेतून दिसून आले. नितीश कुमार यांच्याबद्दल राज्यात असलेली अँटीइन्कबन्सी, त्यांच्या आरोग्याबद्दल नागरिकांनी उपस्थित केलेले प्रश्न, त्यांच्या बदलत्या राजकीय भूमिकेमुळे त्यांच्याबद्दल नाराजी असल्याचे नागरिकांसोबत केलेल्या चर्चेतून स्पष्ट जाणवले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बिहार दौरा आणि एनडीएची रणनिती

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 22 ऑगस्ट रोजी गया जिल्ह्यात दौरा झाला. यात त्यांनी 13 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजन केले. हा त्यांचा 2025 मधील बिहारचा सहावा दौरा होता. यावेळी त्यांनी रेल्वे, रस्ते, वीज, घरकुल, जलसंधारण, आरोग्य क्षेत्राशी संदर्भात विकासकामांचे उद्घाटन केले. 23 ऑगस्ट ते 23 सप्टेंबर दरम्यान बिहारमधील सर्व 243 विधानसभा मतदारसंघांमध्ये एनडीए कार्यकर्ता संमेलन आयोजित केले जाईल. या सर्व संमेलनांमध्ये एनडीएचे प्रमुख नेते सहभागी होणार आहेत.

काँग्रेस आणि जेडीयूच्या प्रदेशाध्यक्षांसाठी यंदाची निवडणूक आव्हानात्मक?

काँग्रेसचे बिहार प्रदेशाध्यक्ष राजेश राम हे दोन वेळा कुटुंबा या राखीव असलेल्या विधानसभा मतदारसंघातून आमदार राहिले आहेत. अपक्ष उमेदवारामुळे झालेल्या मतांच्या विभाजनामुळे, त्यांच्या वडिलांना मानणाऱ्या मतदारांमुळे त्यांचा विजय झाल्याचे बोलले जाते. मात्र, यावेळी एनडीएकडून अनेक जण इच्छूक आहेत. प्रामुख्याने जेडीयू, एलजेपी आणि जितनराम मांझी यांच्या पक्षाला उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. यावेळी देखील अपक्ष उमेदवारामुळे मतांचे विभाजन झाले तर राजेश राम यांची विजय होण्याची शक्यता आहे. महनार विधानसभा मतदारसंघातून इच्छूक असलेले जेडीयूचे प्रदेशाध्यक्ष उमेश सिंह कुशावाहा हे मतदारसंघात मोठ्या प्रमाणात सक्रीय आहेत. या मतदारसंघात राजपूत आणि यादव मतदार निर्णाय ठरतात. आरजेडीकडून राजपूत उमेदवार दिल्यास राजपूत, यादव, मुस्लीम मतदारांचे जातीय समीकरण आरजेडीसाठी फायदेशीर ठरताना दिसते. किंवा राजपूत समाजाचा उमेदवाराने अपक्ष निवडणूक लढवली तर उमेश सिंह कुशवाहा यांच्यासाठी ही निवडणूक आव्हानात्मक असू शकते.

लोजपा पक्षाची एनडीएसोबत राहण्याची भूमिका, केंद्रातील आणि राज्यातील एनडीएचे सरकार आणि त्यांनी राबवलेल्या विविध लोकप्रिय योजना, महिला मतदारांचा एनडीए आघाडीला मिळणारा कौल, मुख्यमंत्री नीतीश कुमार यांची काही प्रमाणातच असलेली अँटीइन्कबन्सी, जातीय समीकरणांचा होणारा एनडीएला फायदा आणि जितन राम मांझी यांची एनडीएसोबत राहण्याची भूमिका यामुळे बिहार राज्यामध्ये आजच्या स्थितीला इंडिया महागठबंधनच्या तुलनेत एनडीए आघाडी मजबूत दिसून येत आहे. मात्र, बिहारमध्ये सुरू असलेली एसआयआरची प्रक्रिया काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी उपस्थित केलेला वोटचोरीचा मुद्दा आणि तेजस्वी यादव यांनी बेरोजगारी आणि स्थलांतराच्या मुद्द्याला घेऊन सरकारविरुद्ध केलेली वातावरण निर्मिती यामुळे बिहारमध्ये दोन्ही आघाड्यांमध्ये तुल्यबळ लढत दिसून येत आहे.

- रुद्र रिसर्च अँड एनालिटीक्स

( नोट रुद्र रिसर्च अँड एनालिटीक्स म्हणजेच ‘रुद्र’ ही संस्था मतदानोत्तर सर्वेक्षण आणि ग्राउंड रिसर्च करते. संस्थेने नुकताच बिहारमधील राजकीय सद्यस्थितीचा आढावा घेतला आहे.)