नवी दिल्ली: देशात लोकसभा निवडणुकांत यंदा आश्चर्यकारक निकाल लागल्याचं पाहायला मिळालं. राम मंदिराच्या मुद्द्यावरुन देशभरात यंदाच्या निवडणुकीत भाजपने प्रचार केला. अब की बार 400 पारचा नारा देत भाजपने गेल्या 10 वर्षांतील विकासकामे, देशपातळीवरील काही महत्त्वाचे निर्णय, आणि अयोध्येतील राम मंदिर हेच निवडणूक प्रचारात प्रमुख मुद्दे बनवले होते. मात्र, उत्तर प्रदेशमधील अयोध्या लोकसभा मतदारसंघातच भाजपचा पराभव झाला आहे. तर, उत्तर प्रदेशातील 80 पैकी 33 जागांवर विजय मिळाला आहे. त्यामुळे, उत्तर प्रदेश भाजपात मोठी उलथापालथ होत आहे. दिल्लीतील बैठकीपूर्वीच युपीच्या भाजप प्रदेशाध्यक्षांनी राजीनामा दिला आहे.


उत्तर प्रदेशात झालेल्या मोठ्या पराभवानंतर भाजप नेते दिल्लीत पोहोचले आहेत. मात्र, दिल्लीतील बैठकीपूर्वीच उत्तर प्रदेश भाजपचे प्रदेशाध्यक्ष भूपेंद्र चौधरी यांनी आपल्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. चौधरी यांनी हायकमांडकडे आपला राजीनामा दिला आहे. मात्र, अद्याप त्यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला नसल्याचे समजते. दरम्यान, भूपेंद्र चौधरी यांनी राज्यातील पराभवाच्या संदर्भाने एक अहवाल तयार केला असून तो अहवाल पक्षाच्या वरिष्ठांकडे सोपवण्यात येणार आहे. उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्राच्या झालेल्या पराभवाच्या अनुषंगाने भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची दिल्लीत बैठक होणार आहे. त्या बैठकीत पराभवाची कारणमिमांसा होणार आहे. मात्र, तत्पू्र्वीच राजीनामा सत्र सुरू झाल्याचं दिसून येत आहे. 


युपीसह महाराष्ट्रातही भाजपला मोठा पराभव पत्कारावा लागला आहे. गत निवडणुकीत भाजपला सर्वाधिक जागा उत्तर प्रदेशातून मिळाल्या होत्या. तर, महाराष्ट्रातूनही 23 जागांवर विजय मिळाला होता. मात्र, यंदाच्या निवडणुकीत उत्तर प्रदेशात केवळ 33 जागांवर भाजपला यश मिळालं असून महाराष्ट्रातही फक्त 9 जागा जिंकता आल्या आहेत. त्यामुळेच, दोन्ही राज्यातील पराभवाचे पडसाद पक्षात उमटल्याचं दिसत आहे. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राज्यातील पराभवाची जबाबदारी स्वीकारत, मला उपमुख्यमंत्री पदावरुन पदमुक्त करण्याची मागणी वरिष्ठांकडे करणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. दरम्यान, गत 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला उत्तर प्रदेशात 62 जागांवर विजय मिळाला होता. मात्र, यंदा केवळ 33 जागांवर विजय मिळाल्याने भाजपच्या जवळपास निम्म्याने जागा कमी झाल्या आहेत. तर, बहुमताचा आकडाही दूर केला आहे. आता मित्रपक्षांसोबत एकत्र येऊन भाजप एनडीएचं सरकार स्थापन करणार आहे.


हेही वाचा


मोदी हेच पंतप्रधान, महाराष्ट्रासाठी मंत्रीपदाचा फॉर्म्युला ठरला?; नितीश कुमार अन् चंद्राबाबूंना 'मोठं पॅकेज'


Kangana Ranaut : विमानतळावर CISF च्या महिला जवानने कानशिलात लगावली; कंगना रणौतचा आरोप