भुवनेश्वर : उदिशातील भुवनेश्वरमध्ये एका तृतीयपंथीयाचं युवकाशी लग्न झालं आहे. हिंदू परंपरेनुसार हा विवाहसोहळा पार पडला. मेघना या तृतीयपंथीयाचं बसुदेव नायक या युवकाशी लग्न झालं.


पहिल्यांदाच एखाद्या तृतीयपंथीय व्यक्तीचा विवाहसोहळा इतक्या वाजतगाजत पार पडला. हा लग्नसोहळा पाहण्यासाठी माध्यमांसह सामान्य नागरिकांनीही मोठी गर्दी केली होती. भुवनेश्वरचे महापौर अनंत नारायण जेना या सोहळ्याला उपस्थित होते. नयापल्ली भागातील दुर्गा मंडपात हा विवाह झाला.

नवरा मुलगा बासूदेव यांचा आधी विवाह झाला होता. त्याला चार वर्षांचा मुलगाही आहे. त्यामुळे तृतीयपंथीयाशी लग्न करण्याचा बासूदेवचा निर्णय कौतुकास्पद असल्याचं म्हटलं जात आहे.

तृतीयपंथीयांना मतदानाचा अधिकार बहाल करण्यात आला आहे. सोबतच मुख्य प्रवाहात आणण्याचा हा एक चांगला प्रयत्न असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. समाजातले शेकडो तृतीयपंथी नोकरी करत आहेत, सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर त्यांना कायदेशीर अधिकारही मिळाले आहेत.