भोपाळ : आध्यात्मिक गुरु भय्यू महाराज यांच्या आत्महत्या प्रकरणात जवळपास गेले साडेतीन महिने बेपत्ता असलेला विनायक दुधाळे सापडला आहे. इंदूर पोलिसांनी आज रात्री आठ वाजता विनायकला ताब्यात घेतलं.

इंदूरच्या आझादनगर पोलिस स्टेशनमध्ये विनायक दुधाळे आणि इतर आठ ते दहा जणांची कसून चौकशी केली जात आहे. विनायक दुधाळे हा भय्यू महाराजांच्या विश्वासतला सेवेकरी होता‌. मात्र जून महिन्यात भय्यू महाराजांनी आत्महत्या केल्यानंतर तो गायब झाला होता.

भय्यू महाराजांचे वकील राजा बडजात्यांकडे पाच कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या आणि धमकावणाऱ्या कैलास पाटीलने विनायक दुधाळे हा शरद देशमुख, शेखर पंडित आणि पलक नावाच्या महिलेच्या सहाय्याने भय्यू महाराजांना ब्लॅकमेल करत असल्याची माहिती पोलिसांना दिली होती. तेव्हापासून इंदूर पोलिस विनायकचा शोध घेत होते.

भय्यू महाराजांची दुसरी पत्नी डॉ. आयुषी शर्मा आणि पहिल्या पत्नीची कन्या कुहू यांनी काही दिवसांपूर्वी पोलिस उपमहानिरीक्षक (डीआयजी) हरीनारायणचारी मिश्र यांची भेट घेतली होती. भय्यू महाराजांचे दोन सेवक आणि एका तरुणीने ब्लॅकमेल केल्याचा आरोप त्यांनी केला होता. या आरोपांमुळे भय्यू महाराजांच्या आत्महत्या प्रकरणाला अचानक नवीन वळण लागलं.

भय्यू महाराजांनी 12 जून 2018 रोजी इंदूरमधील राहत्या घरी गोळी झाडून आत्महत्या केली होती. घरगुती वादातून भय्यू महाराजांनी आत्महत्या केल्याची चर्चा होती.

भय्यू महाराज यांच्या आत्महत्येनंतर सुसाईड नोट सापडली. त्याच्या दुसऱ्या पानावर 'माझ्या माघारी सर्व आर्थिक व्यवहार सेवक विनायकने पाहावा', असा उल्लेख आहे. भय्यू महाराजांचा कुटुंब-कबिला इतका मोठा असूनही, त्यांनी सुसाईड नोटमध्ये सर्व संपत्तीची जबाबदारी नोकराकडे का दिली, असा प्रश्न त्यावेळी अनेकांना पडला होता.

भय्यू महाराजांना पैसे, फ्लॅट आणि गाडीसाठी ब्लॅकमेलिंग केले जात असल्याचा दावाही आयुषी आणि कुहू यांनी केला होता. ब्लॅकमेलिंगमुळे विवंचनेत असलेल्या भय्यू महाराजांनी आत्महत्या केल्याचा संशय दोघींनी व्यक्त केला होता.

पोलिसांच्या ताब्यात असलेला पूर्वीचा ड्रायव्हर कैलास पाटीलला या कटकारस्थानाची माहिती होती. त्याने सेवक विनायक, शरद देशमुख आणि एका तरुणीने रचलेल्या षडयंत्राबाबत जबाब नोंदवला होता. यानुसार कलम 164 अंतर्गत कारवाईची मागणी कुटुंबीयांनी केली होती.

कैलासचा जबाब काय?

'भय्यू महाराजांना गोळी झाडून आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केलं गेलं. फूटी कोठी भागात राहणारी तरुणी याची सूत्रधार आहे. ही तरुणी भय्यू महाराजांच्या दुसऱ्या लग्नापूर्वी त्यांची काळजी घेण्यासाठी येत असे. तिने महाराजांसोबत प्रेमसंबंध जुळवले आणि अश्लील व्हिडिओ तयार केला. डॉ. आयुषी शर्मांसोबत लग्नानंतर तिचं घरी येणं-जाणं बंद झालं. मात्र तिने हा व्हिडिओ सार्वजनिक करण्याची धमकी देत भय्यू महाराजांकडून दरमहा दीड लाख रुपये उकळण्यास सुरुवात केली. ब्लॅकमेलिंगमध्ये महाराजांचा खास सेवक विनायक दुधाळे आणि शेखरही सहभागी झाले. विनायकच्या माध्यमातूनच अनेकदा तरुणीशी संपर्क केला जात असे.' असा जबाब कैलासने दिल्याचं पोलिसांनी सांगितल्याचं मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटलं आहे.

कोण आहे विनायक?

-विनायक दुधाळे हा मूळचा महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील आहे
-विनायक नेहमी भय्यू महाराजांसोबतच असे
-भय्यू महाराजांच्या प्रत्येक निर्णय प्रक्रियेत विनायक सहभागी असे
-विनायकचा शब्द हा भय्यू महाराजांच शब्द मानला जात असे.