जोधपूर : अल्पवयीन मुलीवरील बलात्कारप्रकरणी आसाराम बापूला जन्मठेपेची शिक्षा झाली असून त्याचा मुलगा नारायण साईदेखील सुमारे चार वर्षांपासून सूरतच्या तुरुंगात कैद आहे. आसाराम आणि नारायण साई तर जेलमध्ये आहेत, पण जेलबाहेर देशभरातील त्याचे 400 आश्रम आणि अब्जावधींची संपत्ती अजूनही कायम आहे. आता आसारामचं अब्जावधीचं साम्राज्य त्याची मुलगी भारती सांभाळत आहे.
देशभरात आसारामचे 400 पेक्षा जास्त आश्रम आणि 40 शाळा सुरु आहेत. आता हे संपूर्ण नेटवर्क भारतीच्याच हाती आहे. आसारामच्या अटकेननंतर वडिलांच्या विश्वासू सहकाऱ्याच्या मदतीने भारती आसाराम ट्रस्ट चालवत आहे.
'संत श्री आसारामजी ट्रस्ट'ची धर्मादाय संस्था म्हणून नोंद आहे. याचं मुख्यालय अहमदाबादमध्ये आहे. इथेच आसारामने पहिल्या आश्रमाची स्थापना केली होती. देशातील सर्वच राज्यात पसरलेले आश्रम भारतीच सांभाळत आहे.
आयुष्यभर सुटका नाही, आसारामला जन्मठेप!
सूरत बलात्कार प्रकरणात भारतीही आरोपी
सूरतमधील दोन बहिणींवरील बलात्कारप्रकरणी आसाराम, त्याचा मुलगा नारायण साई यांच्यासोबत त्याची मुलगी भारती आणि त्याची पत्नी लक्ष्मीलाही आरोपी बनवण्यात आलं होतं. सूरत बलात्कार प्रकरणात आसाराम आणि नारायण साई तर जेलची हवा खात आहेत, तर भारती आणि लक्ष्मी जामीनावर बाहेर आहेत.
भारती आणि लक्ष्मीवर आरोप
पीडित मुलींच्या माहितीनुसार, भारती मुलींना गाडीत बसवून सोडायला जात असे आणि घेऊनही येत असे. तर आसाराम भारतीला फोन करायचा आणि ती गाडीतून मुलींना आणायची. तसंच आसारामची पत्नी लक्ष्मी मुलींना आश्रमातून पाठवत असे.
याचाच अर्थ भारती आणि तिची आई आसाराम तसंच तिचा मुलगा नारायण साईच्या कथित सेक्स रॅकेटमध्ये साखळीचं काम करत होत्या. दोघीही त्यांच्यासाठी मुलींना तयार करायच्या. आसाराम आणि नारायण साई तुमचं कल्याण करतील, असं सांगून आई-मुलगी त्यांना तयार करत असत.
भारती फरार
सूरतच्या बहिणींच्या आरोपांनंतर भारती दिसलेली नाही. ती फरार असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र या प्रकरणावर अद्याप कोर्टाचा निकाल येणं बाकी आहे.
आसारामला मरेपर्यंत जन्मठेप
अल्पवयीन मुलीवरील बलात्काराप्रकरणात दोषी ठरलेला आसारामला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. जोधपूर SC आणि ST कोर्टाने ही शिक्षा ठोठावली. याप्रकरणातील दुसरे आरोपी शरद आणि शिल्पी यांना 20-20 वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा सुनावली.
जोधपूर कोर्टाने आसारामला पोक्सोसह अन्य तीन कलमांतर्गत दोषी धरत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. जन्मठेप म्हणजेच जिवंत असेपर्यंत जेलमध्येच राहावं लागेल. त्यामुळे आसाराम बापूचे जेलमधून सुटण्याचं स्वप्न भंगलं आहे. आसाराम गेल्या 1 हजार 667 दिवस जोधपूर सेंट्रल जेलमध्ये आहे.
जोधपूर कोर्टाने आज सकाळीच आसारामसह शरद आणि शिल्पी या तिघांना दोषी ठरवलं. तर प्रकाश आणि शिवा या दोन आरोपींना निर्दोष ठरवण्यात आलं. एकूण पाच आरोपींबाबत कोर्टाने आज निर्णय दिला.
6 नोव्हेंबर 2013 रोजी पोलिसांनी आसाराम आणि त्याचे सहकारी शिवा, शिल्पी, शरद आणि प्रकाश यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केलं होतं.
आसारामविरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत, जुवेनाईल जस्टिस्ट अर्थात अल्पवयीन न्याय आणि आयपीसीच्या अन्य कलमांअतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.