Bharat Bandh LIVE UPDATES : आज शेतकऱ्यांचा देशव्यापी बंद, जाणून घ्या क्षणाक्षणाचे अपडेट्स

Bharat Bandh Today, 8 December 2020 LIVE Updates: नव्या कृषी कायद्याला विरोध करीत शेतकरी संघटनांच्या वतीने आज, म्हणजेच 8 डिसेंबरला 'भारत बंद' पुकारण्यात आला आहे. गेल्या 13 दिवसांपासून राजधानी दिल्लीत आंदोलन करणार्‍या शेतकरी आणि सरकारमध्ये झालेल्या पाच बैठकांनंतरही कोणताही निकाल लागलेला नाही. या बंदला काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेससह देशभरातील अनेक विरोधी पक्ष तसेच शेतकरी संघटनांनी समर्थन दिलं आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 08 Dec 2020 04:29 PM
केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी विधेयकाच्या विरोधात आज पंढरपुरात जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने पंढरपूर - सांगली रस्त्यावर टायर पेटवून आंदोलन केले.
आज पंढरपुरात विविध शेतकरी संघटना आणि महाविकास आघाडीच्या वतीने बंद मध्ये सहभाग घेतला. त्यानंतर जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष नितीन नागणे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी रस्त्यावर टायर पेटवून आंदोलन केले. यावेळी मोदी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली.
केंद्र सरकारनं लागू केलेल्या कृषी विधेयकाच्या विरोधात गेल्या 13 दिवसांपासून पंजाब आणि हरियाणा येथील शेतकरी दिल्ली येथे आंदोलन करत आहेत. या आंदोलनात आता ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे देखील उतरले आहेत. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून अण्णा हजारे यांनी 1 दिवसीय लाक्षणिक उपोषण सुरू केले आहे.
औरंगाबादेत नव्या कृषी कायद्याला विरोध करण्यासाठी पुकारलेल्या भारत बंद दरम्यान आंदोलकांनी शहरातील दिल्लीगेट बागांमध्ये निदर्शने केली. या सर्वपक्षीय निदर्शकांनी दिल्ली गेट भागात काही काळ रस्ता रोको करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं, आंदोलक आणि पोलिस यांच्यामध्ये झटापट झाली
दिल्ली येथे शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ पुकारण्यात आलेल्या भारत बंदला संमिश्र प्रतिसाद पाहायला मिळाला.. यावेळी मोर्चात विविध सामाजिक संघटना, शेतकरी संघटनांनी सहभाग नोंदवला... मोर्चामध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभाग नोंदवला.. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून मुख्य मार्गानं निघालेल्या मोर्चाचा समारोप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ समारोप करण्यात आला..
दरम्यान काही प्रतिष्ठान बंद होती तर काही प्रतिष्ठान सुरू होती.. यावेळी रॅली काढून दुकान बंद करण्याच आवाहन करण्यात आलं.. काही दुकानांच अर्ध शटर उघड ठेवल्याच दिसत होतं.. बाजार समित्या मुख्यत्वे बंद राहिल्यात.. वर्ध्यातील सावंगी टी पॉइंटवर काही वेळ रस्ता रोको करण्यात आला..
भारत बंद आंदोलन दरम्यान सांगली मध्ये युवक काँग्रेस कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. केंद्र सरकारचा पुतळा दहन करताना सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात समोर हा प्रकार घडला. शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी रॅली काढत काँग्रेसने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी पुतळा दहन करण्याचा प्रयत्न होता .मात्र पोलिसांनी तो पुतळा काढून घेतला. काँग्रेस कार्यकर्त्यांनी यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत केंद्र सरकारच्या पुतळ्याचं दहन करण्याचा प्रयत्न केला आणि पोलिसांनी हा पुतळा दहन प्रयत्न हाणून पाडला. दरम्यान यावेळी पोलीस आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये पुतळा दहन वेळी झटापटीचा प्रकार घडला. पोलिसांनी आंदोलकांच्या ताब्यातला पुतळा काढून घेतला.त्यामुळे काही वेळ याठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देत आष्टीत एकूण अकरा संघटनेने आष्टी तालुका बंदची हाक देत आज सकाळी किनारा चौक ते तहसील कार्यालया पर्यंत रॅली काढत केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी कायद्याचा निषेध नोंदवला. केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी कायद्याच्या विरोधात दशक्रिया विधी आंदोलन करून आंदोलन कर्त्यांनी तहसील कार्यालयासमोर मुंडन केले..यावेळी आष्टी शहरातील काही व्यापाऱ्यांनी बंदला केराची टोपली दाखवून दुकाने चालू ठेवली होती त्या व्यापाऱ्यांचे समन्वय समितीच्या वतीने गांधीगिरी पद्धतीने सत्कार करण्यात आला.
शेतकरी संघटनेने पुकारलेल्या भारत बंदला बेळगावात संमिश्र प्रतिसाद मिळाला. सकाळी सहा वाजल्यापासून विविध संघटनांचे कार्यकर्ते विविध भागात फिरून बंदला पाठिंबा देण्याचे आवाहन करत होते.रयत संघटना,हसिरू सेना,अंगणवाडी ,कामगार संघटना आदी तीसहून अधिक संघटना भारत बंदमध्ये सहभागी झाल्या होत्या.शहरातील काही भागातील दुकाने बंद होती तर उपनगरात व्यवहार नेहमी प्रमाणे सुरळीत सुरू होते.काही काळ शहर आणि बाहेरगावचे ची बस सेवा बंद ठेवण्यात आली होती.राणी कितुर चन्नमा चौकात जमून आंदोलनकर्त्यांनी वाहतूक रोखून धरली.आंदोलनकर्त्यांनी हातात हिरवे आणि लाल झेंडे हातात धरले होते.यावेळी विविध संघटनाच्या पदाधिकाऱ्यांची भाषणे झाली.शेतकरी विरोधी कायदा रद्द करा,केंद्रातील मोदी सरकारचा निषेध असो अशी घोषणाबाजी आंदोलकांनी केली.
मनमाड : कृषी कायदा रद्द करण्यात यावा या मागणीसाठी किसान सभा आणि काँग्रेस रस्त्यावर उतरली आहे. मोर्चा काढून पुणे-इंदौर महामार्गावर रस्ता रोको करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं आहे.
विदर्भातील सर्वात मोठी कृषी उत्पन्न बाजार समिती कळमना बाजारात आज बहुतांशी व्यवहार सुरु होते... सकाळी भाज्यांचे आणि दुपार पासून धान्याचे खरेदी विक्री व्यवहार सुरळीत असल्याचे आज पाहायला मिळाले.... मात्र, रोजच्या तुलनेत खरेदी विक्रीचे व्यवहार काही प्रमाणात कमी झाले... बाजारात दलाल म्हणून काम करणाऱ्या आढते वर्गाने आज बाजारात नारे निदर्शने करत केंद्र सरकार ने लागू केलेल्या नव्या कृषी कायद्यांना विरोध दर्शविला... केंद्र सरकारचे नवे कायदे शेतकऱ्यांसह बाजार समितीत काम करणाऱ्या आढते वर्गाला देशोधडीला लावेल असा आरोप आंदोलकांनी केला... दरम्यान, व्यापाऱ्यांनी आजच्या भारत बंदचा नागपूरच्या कळमना बाजारात फारसा परिणाम झाला नसल्याचे मत व्यक्त केले...
सोलापूर -

पोलिसांनी नरसय्या आडम यांचा मोर्चा रोखला,

नसरय्या आडम आणि माकपच्या कार्यकर्त्यांनि रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला,

माकपच्या भारत बंदच्या समर्थनार्थ काढण्यात येणार होता मोर्चा,

रास्ता रोको करणाऱ्या कार्यकर्त्यांची पोलीसांची धरपकड,

माजी आमदार नरसय्या आडम आणि काही कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात
नवी दिल्ली : शरद पवार-राजनाथ सिंह यांच्यात साऊथ ब्लॉकमधे सुरु असलेली बैठक संपली असून दोघांमध्ये साधारतः अर्धा तास चर्चा झाली. यानंतर शरद पवार माध्यमांशी संवाद साधणार आहेत.
कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्कसिस्ट) यांच्यावतीनं मुंबईत विविध ठिकाणी भारत बंदच्या पार्श्वभूमीवर आंदोलनं करण्यात आली. मुंबईतील मरोळ, पवई, अंधेरी रेल्वे स्थानक, मालवणी(मालाड), मीरारोड, इ. ठिकीणी मोर्चे, निदर्शनं, मानवी साखळीचं आयोजन करण्यात आलं. काही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस आणि सीपीआयएमच्या वतीनं संयुक्त आंदोलन करण्यात आलं. मुंबईच्या जनजीनवावर या भारत बंदचा फारसा प्रभाव पडला नसला तरी अनेक ठिकाणी व्यापा-यांनी दुकानं बंद ठेवणंच पसंत केलं होतं.
यवतमाळ : दिल्ली येथे सुरु असलेल्या शेतकरी कृषी कायद्या विरोधातील आंदोलनाला यवतमाळ जिल्ह्यात प्रतिसाद मिळाला आहे. विविध सघटनांचा आंदोलनाला पाठिंबा मिळाला आहे.
जिल्ह्याच्या सर्वच बाजार समित्याही बंद ठेवण्यात आल्या आहेत.
यवतमाळच्या बस स्थानक चौकात आंदोलकांचा ठिय्या पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडीचे सर्वच नेते आंदोलनात सहभागी झाले आहेत.
गडचिरोली : भारत बंदला संमिश्र प्रतिसाद, गडचिरोली, देसाईगंज-वडसा शहरात बाजारपेठांसह बाजार समित्याही बंद मात्र शहरातील भाजीपाला मार्केट सुरु आहे. गडचिरोली चंद्रपूर मार्गावर चक्का जाम दक्षिण गडचिरोली भागातील मुख्य शहर असलेल्या आलापल्लीसह इतर शहरांत दुकानं खुली ठेवण्यात आली आहेत. कोरोनामुळे झालेल्या नुकसामुळे दुकानं बंद ठेवण्यास मनाई करण्यात आली आहे.
भिवंडी : कृषी कायद्या विरोधात शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या भारत बंदला विविध राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला असल्याने तो सर्वत्र यशस्वी होत असताना भिवंडी शहर आणि ग्रामीण भागात सकाळी साडेदहा वाजेपर्यंत सर्व व्यवहार आणि वाहतूक सुरळीत सुरु होती. शहरातील रिक्षा आणि एसटी वाहतूक, यंत्रमाग ,भाजी मार्केट, मुंबई-नाशिक महामार्गावरील दोन्ही बाजूकडील वाहतूक सुरळीत सुरु असल्याने भारत बंद भिवंडीत अयशस्वी ठरला आहे. दरम्यान भारत बंद ला पाठिंबा देणारे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, डाव्या विचारांचे पक्ष अजूनही रस्त्यावर उतरले नसून दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास ते आंदोलन करणार असल्याचे समजते.
मुंबईसह उपनगरांमध्ये आज भारत बंदमुळे कमी प्रमाणात बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या आहे. त्यामुळे बेस्ट आणि एनएमएमटीने रस्त्यावर कमी प्रमाणात गाड्या उतरवल्या आहेत. सध्या संपामुळे अनेकजण घरातून बाहेर पडलेले नाहीत त्यामुळे बेस्ट आणि एनएमएमटीने आपल्या गाड्या दररोजच्या तुलनेत आज थोड्या कमी सोडल्या आहेत. मात्र दुपारनंतर गर्दी वाढली तर तत्काळ आम्ही गाड्या रस्त्यावर सोडू अशी प्रतिक्रिया एनएमएमटीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.
वसई विरार नालासोपारा शहरात ही आज भारत बंदला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. रिक्षा, दुकाने आज सकाळपासून बंद ठेवण्यात आली आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीने आज वसई रेल्वे स्थानकाजवळ उतरून दुकानदारांना दुकाने बंद ठेवण्याची विनंती केली. त्याला चांगला प्रतिसाद ही मिळाला. केंद्र सरकारच्या कृषी कायद्यास विरोध म्हणून आज भारत बंदच आवहान करण्यात आलं होतं. वसई विरारमधून या बंदला राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस, शिवसेना सहित, येथील सत्ताधारी पक्ष बहुजन विकास आघाडीने ही पांठिबा दिला आहे.
शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदला बारामतीतून चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे.. बारामती कृषी उत्पन्न बाजार समिती बंद ठेवण्यात आली आहे.. सोबतच सासवड, इंदापूर आणि दौड कृषी उत्पन्न बाजार समिती देखील बंद आहे.. भिगवनचे मच्छी मार्केट देखील बंद ठेवण्यात आले आहे.. रस्ते वाहतूक मात्र सुरळीत सुरू आहे... बारामतीत शहरातील दुकाने देखील बंद ठेवण्यात आली आहेत..
शेतकरी हा अन्नदाता आहे. समाजातील कोणत्याही घटकात जर असंतोष असेल तर त्यांच्याशी चर्चा करुन त्यावर तोडगा काढणे ही सरकारची नैतिक जबाबदारी आहे, खासदार सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया
रायगड : जिल्ह्यात भारत बंदला मिश्र प्रतिसाद, सर्व व्यवहार सुरळीत सुरु असून अलिबाग, माणगाव भागांत दैनंदिन व्यवहार सुरु आहेत. जिल्ह्यातील अनेक भागांत हॉटेल आणि दुकाने उघडली आहेत. जिल्ह्यातील एसटी, रिक्षा मिनिडोअर वाहतूक सुरु आहे. भारत बंदमुळे रस्त्यावरील वर्दळ नेहमीच्या तुलनेत कमी आहे.
पुण्यातील व्यापारी संघटनांनी त्यांची आधीची भूमिका बदलत शेतकऱ्यांच्या भारत बंदमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे पुण्यातील लक्ष्मी रस्ता असेल किंवा इतर बाजारपेठा या दुपारपर्यंत तरी बंद राहणार आहेत. आधी व्यापारी संघटनांनी बंदला पाठिंबा जाहिर केला मात्र बंदमध्ये सहभागी होणार नाही असं म्हटलं होतं. परंतु बंदला समर्थन देण्यासाठी पुण्यात काढण्यात येणारा मोर्चा मुख्य बाजारपेठेतुन जाणार असल्यानं किमान दुपारपर्यंत या संपामध्ये सहभागी होण्याचा निर्णय व्यापारी संघटनांनी घेतलाय.
बुलडाणा - बुलडाणा जिल्ह्यातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्र 6 नांदुरा येथे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आमदार राजेश एकडे यांच्या नेतृत्वात अडवला, गेल्या एक तासापासून महामार्ग ठप्प, वाहतून खोळंबली, नांदुरा येथे केंद्र सरकार विरोधात प्रचंड घोषणाबाजी, जवळपास 500 कार्यकर्ते रस्त्यावर
सोलापुरात भारत बंद पार्श्वभूमीवर माकपच्यावतीने मोर्चा काढण्यात येणार आहे. माजी आमदार नरसय्या आडम यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात विविध संघटना देखील सहभागी होतील. सकाळी 11 वाजता दत्तनगर परिसरातील माकपच्या कार्यालयासमोर मोर्चाला सुरुवात होईल. जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा जाणार आहे. मोर्चेकरी अद्याप एकत्रित व्हायचे आहेत मात्र त्या आधी पोलिसांनी तगडा बंदोबस्त तैनात केला आहे. जवळपास 100 पेक्षा जास्त पोलीस बंदोबस्तासाठी सकाळपासून माकप कार्यालयाबाहेर तैनात करण्यात आले आहेत.
भारत बंद दरम्यान आज राजधानी दिल्लीत ओला-उबर चालणार नाही, सर्वोदय ड्रायवर्स असोसिएशनकडून शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर समर्थनार्थ निर्णय, ऑल इंडिया मोटर ट्रांसपोर्ट काँग्रेसकडूनही देशव्यापी चक्काजामची घोषणा
गृह मंत्रालयाकडून भारत बंदच्या पार्श्वभूमीवर अॅडव्हायझरी जारी, सर्व राज्यांना कायदा व्यवस्था राखण्याचं केलं आवाहन, बंद दरम्यान अनुचित घटना घडू नये यासाठी व्यवस्था निश्चित करण्याचे निर्देश
कृषी कायद्यांच्या विरोधात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सिंघू बॉर्डरवर कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शेतकरी संघटनांनी आज कृषी कायद्यांविरोधात 'भारत बंद'ची हाक दिली आहे.

दिल्लीला नोयडाशी जोडणारा नॅशनल हायवे 24 वर पोलिसांची बॅरिकेडिंग, या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर शेतकरी जमले, दिल्ली जाण्यासाठी NH 24 ऐवजी अप्सरा, भोपड आणि डीएनडी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन
नवी दिल्ली : नोयडा लिंक रोडवर चिल्ला बॉर्डर बंद केला आहे. नोयडा लिंक रोडवर गौतम बुद्ध गेटजवळ शेतकऱ्यांची निदर्शनं, नोयडा ते दिल्ली रस्ता बंद, पोलिसांकडून या मार्गाने न येता डीएनडी मार्गाने जाण्याचं केलं आवाहन
पश्चिम बंगालची राजधानी कोलकातामध्ये भारत बंदच्या समर्थनार्थ आंदोलन करणाऱ्या विरोधी पक्षांनी जादवपूरमध्ये रेल रोको केला. येथे पक्षाचे कार्यकर्ते रेल्वे रुळांवर उतरले आणि केंद्र सरकारकडे नवे कृषी कायदे मागे घेण्याची मागणी केली. तसेच सरकारविरोधात घोषणाबाजीही करण्यात आली.
नाशिक- भारत बंदला पाठिंबा देण्यासाठी जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांनी कडकडीत बंद पुकारला आहे. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वारावरच भाजीपाला खरेदी विक्रीचे व्यवहार सुरू होते. बाजार समितीने आधी कल्पना दिली नसल्याचे व्यपाऱ्यांचं म्हणणं आहे, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरातहुन गाजर, मिरची, वाटाणा हा शेतीमाल तीन दिवसांपासून नाशिकच्या दिशेनं निघाला होता. तो शहरात पहाटे दाखल झाला, त्यामुळे बंदला पाठिंबा देत नुकसान टाळण्यासाठी व्यवहार करावे लागत असल्याचे व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे
पुणे-नाशिक महामार्गावर बंदचा कोणताच परिणाम नाही. चाकणच्या मुख्य चौकात वाहनांची वर्दळ सुरु,. याच भागात एमआयडीसी असल्याने कामगार वर्ग कामावर पोहोचतोय. तर रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांनी ही मोठी गर्दी केली आहे

दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी कृषी कायद्या विरोधात आंदोलन सुरू असून या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज राज्यात पुकारलेल्या बंदमध्ये नाशिक जिल्ह्यातील लासलगाव,मनमाड सह जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यांनी पाठिंबा दिल्याने बाजार समिती मध्ये शुकशुकाट पहावयास मिळाला,सकाळ पासूनच गजबजणाऱ्या बाजार समिती मध्ये कुठल्याच मालाची आवक झाली नाही.
पहाटेपासून खरेदी आणि विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होणाऱ्या नवी मुंबई एपीएमसी मार्केट मध्ये आज मात्र मोठ्याप्रमाणात शुकशुकाट पाहिला मिळत आहे. दररोज या मार्केटला भाजी विक्रीसाठी जवळपास 1200 ते 1300 गाड्या येत असतात. परंतु आज मात्र व्यापारी, शेतकरी आणि कामगारांनी भारतबंद मध्ये सहभाग घेत कडकडीत बंद पाळला आहे.
दिल्लीत सुरू असलेल्या कृषी विधेयक विरोधात आज भारत बंद च्या आवाहनाला प्रतिसाद देत पुणतांबा गावात कडकडीत बंद दिसत असून देशातील पहिला शेतकरी संप याच पुणतांबा गावात करण्यात आला होता... आज सकाळ पासूनच गावातील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संदीप जगताप यांनी दिंडोरी तालुक्यातील चिंचखेड गावात शेतकरी विरोधी कृषी कायद्यांची होळी केली. भारत बंद ला सक्रिय सुरवात केली.तसेच केंद्र सरकारने केलेले हे नवे कायदे शेतकऱ्यांना उद्योगपतींच्या घशात घालणारे आहे.शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणारे आहे.त्यामुळे ते रद्द झाले पाहिजे .अशी मागणी यावेळी जगताप यांनी केली. जोरदार घोषणा केंद्र सरकारच्या विरोधात देण्यात आल्या.
नागपूरचे प्रसिद्ध संत्रा मार्केट मधील व्यवहार सुरू आहेत... व्यापारी आपले माल विक्री साठी घेऊन बसले आहेत, दुकाने उघडी आहेत, मात्र रोज च्या तुलनेत ग्राहक आणि विक्री कमी आहे.. नाशवंत माल असल्याने आमचा नाईलाज असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे..
सोलापूर : शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदला पाठिंबा देण्यासाठी सोलापुरात कृषी उत्पन्न बाजार समिती देखील बंद ठेवण्यात आली आहे. बाजारात अगदी पहाटे पासून सुरू होणारे लिलाव आज बंद पाहायला मिळाले. कांदा, भुसार, किराणा मालाची बाजारपेठ पूर्णपणे बंद आहे. तर नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी किरकोळ भाजी विक्री करण्यात येणारी भाजी मंडई मात्र सुरूच ठेवण्यात आली आहे. शेतकरी कायद्यांच्या विरोधात दिल्लीत आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी भारत बंद करण्याची हाक देण्यात आली होती. त्यानुसार काल सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अडते, व्यापारी, हमाल, माथाडी कामगार या सर्वांची एकत्रितपणे बैठक पार पडली. त्यानुसार बाजार समिती बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. आज बंद मध्ये सर्वच घटक सहभागी झाल्याचं चित्र पाहयाला मिळत आहे.
सोलापूर : शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदला पाठिंबा देण्यासाठी सोलापुरात कृषी उत्पन्न बाजार समिती देखील बंद ठेवण्यात आली आहे. बाजारात अगदी पहाटे पासून सुरू होणारे लिलाव आज बंद पाहायला मिळाले. कांदा, भुसार, किराणा मालाची बाजारपेठ पूर्णपणे बंद आहे. तर नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी किरकोळ भाजी विक्री करण्यात येणारी भाजी मंडई मात्र सुरूच ठेवण्यात आली आहे. शेतकरी कायद्यांच्या विरोधात दिल्लीत आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी भारत बंद करण्याची हाक देण्यात आली होती. त्यानुसार काल सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अडते, व्यापारी, हमाल, माथाडी कामगार या सर्वांची एकत्रितपणे बैठक पार पडली. त्यानुसार बाजार समिती बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. आज बंद मध्ये सर्वच घटक सहभागी झाल्याचं चित्र पाहयाला मिळत आहे.
शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदला पाठिंबा देण्यासाठी सोलापुरात कृषी उत्पन्न बाजार समिती देखील बंद ठेवण्यात आली आहे. बाजारात अगदी पहाटे पासून सुरू होणारे लिलाव आज बंद पाहायला मिळाले. कांदा, भुसार, किराणा मालाची बाजारपेठ पूर्णपणे बंद आहे. तर नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी किरकोळ भाजी विक्री करण्यात येणारी भाजी मंडई मात्र सुरूच ठेवण्यात आली आहे. शेतकरी कायद्यांच्या विरोधात दिल्लीत आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी भारत बंद करण्याची हाक देण्यात आली होती. त्यानुसार काल सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अडते, व्यापारी, हमाल, माथाडी कामगार या सर्वांची एकत्रितपणे बैठक पार पडली. त्यानुसार बाजार समिती बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. आज बंद मध्ये सर्वच घटक सहभागी झाल्याचं चित्र पाहायाला मिळत आहे.
नाशिक : #BharatBandh ला समर्थन करत नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती बंद ठेवण्यात आली आहे. तसेच नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीबाहेर पोलीसांचा कडेकोट बंदोबस्त आहे.
पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमधे शेतकऱ्यांनी पुकारलेल्या बंदचा परिणाम दिसून येतोय. फळं आणि भाजीपाला घेऊन येणाऱ्या फक्त 174 गाड्यांची आज पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आवक झालीय. एरवी दररोज किमान 900 मालवाहतूक गाड्यांमधून या बाजार समितीत फळं आणि भाजीपाल्याची आवक होत असते. त्यामुळे बाजार समितीत आज गर्दी दिसून येत नाहीये. बाजार समितीतील किराणा आणि भुसार मालाची बाजारपेठ शेतकरी बंदच्या समर्थनार्थ बंद ठेवण्याचा निर्णय आधीच घेण्यात आला.
जालना : दिल्ली येथील सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने दूध वाटप करून या आंदोलनाची सुरुवात करण्यात आली. जालना जिल्ह्यातील वडीगोद्री येथे बाळगोपाळांना तसेच ग्रामस्थांना दूध वाटप करून या आंदोलनाची सुरुवात करण्यात आली आहे. आज दूध बाजारात घेऊन न जाता ते मोफत वाटून या कार्यकर्त्यांनी शेतकरी कायद्याचा निषेध केला. दिल्लीतील शेतकरी आंदोलन हे अत्यंत शांततेने सुरु आहे. या आंदोलनात महाराष्ट्रातूनही शेतकऱ्यांनी शांततेनं सहभागी होण्याचं आवाहन राजू शेट्टी यांनी केले होते. त्यामुळे या आंदोलना कुठलाही गालबोट न लावता, कुठे ही अनुचित प्रकार न करता शांततेत दिवसभर बंद पाळण्यात येणार आहे.
नवी मुंबई : #BharatBandh मध्ये एपीएमसीमधील माथाडी, व्यापारी वर्गानेही 100 टक्के बंद पुकारला आहे. एपीएमसी मधील भाजीपाला, फळ, कांदा-बटाटा, दाना, मसाला अशी पाचही मार्केट बंद राहणार आहेत.
दिल्लीत सुरु असलेल्या कृषी विधेयक विरोधात आज भारत बंदच्या आवाहनाला प्रतिसाद देत पुणतांबा गावात कडकडीत बंद ठेवण्यात आला आहे. देशातील पहिला शेतकरी संप याच पुणतांबा गावात करण्यात आला होता. आज सकाळपासूनच गावातील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत.
शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदला पाठिंबा देण्यासाठी पुण्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील किराणा आणि भुसार मालाची बाजारपेठ आज बंद ठेवण्यात येणार आहे. त्याचबरोबर आडत्यांच्या संघटनेनीही या बंदमध्ये सहभागी व्हायचे ठरवले आहे. परंतु कृषी उत्पन्न बाजार समितीतील फळे आणि भाजीपाला बाजार मात्र आज सुरूच राहणार आहे. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीवरती प्रशासकाची नियुक्ती आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज सकाळी साडेदहा वाजता वेगवेगळ्या संघटनांकडून निदर्शने करण्यात येणार आहेत. तर सकाळी 11 वाजता कॉंग्रेस आणि इतर राजकीय पक्षांतर्फे पुण्यातील अलका चौकातून महात्मा फुले मंडईपर्यंत मोर्चाही काढण्यात येणार आहे. पुण्यातील व्यापारी संघटनांनी शेतकरी बंदला पाठिंबा दिला असला तरी या बंदमध्ये सहभागी होणार नसल्याचं आणि दुकान सुरुच ठेवणार असल्याचं सांगितलंय.
पुण्यातील चाकण कृषी उत्पन्न बाजार समिती ही कडकडीत बंद आहे. दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भारत बंदची हाक देण्यात आलीये. त्याअनुषंगाने शेतकरी, व्यापारी आणि आडत्यांनी पाठिंबा दर्शवला आहे. गेल्या सत्तर वर्षात ही बाजारपेठ दुसऱ्यांदाच बंद आहे.त्यामुळे आज दोन कोटींची उलाढाल ठप्प असणार आहे. दुसरीकडे जुन्नर तालुक्यातील नारायणगाव, ओतूर आणि आळेफाटा बाजार बंद असल्याने तिथं ही दोन कोटींची उलाढाल होणार नाही.
बुलढाणा : #BharatBandh च्या पार्श्वभूमीवर सकाळी 6 वाजून 30 मिनिटांनी बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर रेल्वे स्थानकावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात चेन्नई -अहमदाबाद नवजीवन एक्सप्रेस अडवली.

पार्श्वभूमी



Bharat Bandh : नव्या कृषी कायद्याला विरोध करीत शेतकरी संघटनांच्या वतीने आज, म्हणजेच 8 डिसेंबरला 'भारत बंद' पुकारण्यात आला आहे. गेल्या 13 दिवसांपासून राजधानी दिल्लीत आंदोलन करणार्‍या शेतकरी आणि सरकारमध्ये झालेल्या पाच बैठकांनंतरही कोणताही निकाल लागलेला नाही. 9 डिसेंबरला शेतकरी आणि सरकार यांच्यात आणखी एक बैठक होणार आहे. अशा परिस्थितीत 8 डिसेंबरला 'भारत बंद' कसा होईल, हे जाणून घेणे फार महत्वाचे आहे. दरम्यान या बंदला काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेससह देशभरातील अनेक विरोधी पक्ष तसेच शेतकरी संघटनांनी समर्थन दिलं आहे.




जवळपास सर्वच विरोधी पक्षांनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शवला असून 'भारत बंद'ला देखील समर्थन दर्शवलं आहे. तसेच, देशव्यापी बंदच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून राज्य व केंद्रशासित प्रदेशांना नियमावली पाठवण्यात आली आहे. नियमावली पाठवताना केंद्रीय गृह मंत्रालयाने राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांना भारत बंद दरम्यान कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये आणि कायदा आणि शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी सांगितले आहे. याव्यतिरिक्त, राज्य सरकारे आणि केंद्रशासित प्रदेश प्रशासकांनी कोविड -19 च्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले पाहिजे. सोशल डिस्टन्स राहिल याची काळजी घेतली पाहिजे.




जाणून घ्या शेतकऱ्यांच्या भारत बंदशी निगडीत 10 मोठ्या गोष्टी :




1. सर्वांना 'सांकेतिक' बंदमध्ये सहभागी होण्याचं आव्हान करत शेतकरी प्रतिनिधींनी म्हटलं आहे की, "आंदोलनातंर्गत सकाळी 11 वाजल्यापासून ते दुपारी 3 वाजेपर्यंत ते 'चक्का जाम' आंदोलन करतील. ज्यादरम्यान, प्रमुख रस्त्यांवर आंदोलन करण्यात येणार आहे. आंदोलनातंर्गत उत्तरेकडील राज्यांमध्ये खासकरुन पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि दिल्लीतील शेतकरी रस्त्यावर उतरणार आहेत.




2. शेतकरी नेते राकेश टिकैत म्हणाले की, "आमचा भार बंद राजकीय पक्षांच्या बंदपेक्षा वेगळा असणार आहे. हा विचारधारेमुळे करण्यात येणारा चार तासांचा सांकेतिक बंद आहे. सामान्या माणसांना कोणताही त्रास होऊ नये त्यासाठी आम्ही या वेळेत त्यांनी प्रवास करु नये, असं आवाहन करतो." पुढे बोलताना ते म्हणाले की, "आम्ही दुकानदारांनाही या वेळेत आपली दुकानं बंद ठेवण्याची विनंती करतो."




3. भारतीय शेतकरी एका संघटनेचे अध्यक्ष जगजीत सिंह दल्लेवाल यांनी शेतकऱ्यांना शांतता राखण्याचं आव्हान केलं आहे. तसेच भारत बंद व्यवस्थित पार पाडण्यासाठी कोणावरही जबरदस्ती न करण्याचं आव्हान केलं आहे. तसेच ते म्हणाले की, "भारत बंद दरम्यान, आपत्कालीन सेवांना सूट देण्यात आली आहे."




4. अनेक नेत्यांनी दावा केला आहे की, भारत बंद संपूर्ण देशात प्रभावी असणार आहे. शेतकरी नेते बलबील सिंह राजेवाल यांनी सांगितलं की, "मोदी सरकारला आमच्या मागण्या मान्य कराव्या लागतील. आम्ही नव्या कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीवर ठाम आहोत."




5. केंद्र सरकार आणि शेतकरी यांच्या भारत बंदच्या एका दिवसांनी म्हणजेच, 9 डिसेंबरला सहाव्या फेरिची बैठक पार पडणार आहे. कारण मागील बैठक निष्फळ ठरली आहे. विरोधी पक्षांनी शेतकरी आंदोलनाला दिलेला पाठिंब्यानंतर भाजपनं त्यांची विचारसरणी अत्यंत लज्जास्पद आणि दुटप्पी असल्याचं म्हटलं आहे.




रविशंकर प्रसाद पुढे बोलताना म्हणाले की, "आम्ही विरोधी पक्ष, विशेषतः काँग्रेस, राष्ट्रवादी आणि त्यांच्यासोबत असलेल्या इतर पक्षांच्या लज्जास्पद दुहेरी मानसिकता देशासमोर आणण्यासाठी आलो आहोत. जेव्हा यांचं राजकीय अस्तित्व संपत आलं आहे, त्यावेळी ते वाचवण्यासाठी ते कोणत्याही सरकार विरोधी आंदोलनात सहभागी होत आहेत." रविशंकर प्रसाद म्हणाले की, "जे आम्ही केलं, यूपीए सरकारही तेच करत होती."




6. शेतकरी आंदोलनाला सेलिब्रिटी, खेळाडू आणि मजूर संघटनांसह विविध वर्गातील लोकांनीही समर्थन दर्शवलं आहे. जवळपास 95 लाख ट्रक मालक आणि इतरांचं प्रतिनिधित्व करणारी देशभरातील ट्रान्सपोर्ट संस्थांची मुख्य संस्था ऑल इंडिया मोटर ट्रांसपोर्ट काँग्रेस (एआईएमटीसी) ने सांगितलं की, बंदच्या समर्थनार्थ ते संपूर्ण देशात आपलं संचलन बंद ठेवणार आहे. अशातच आजच्या भारत बंदचा वाहतूक सेवांवरही परिणाम होऊ शकतो.




7. भारत बंदच्या दिवशी शेतकरी संघटनांनी दूध, फळे आणि भाजीपाल्याच्या सेवा पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे, म्हणजे तुम्हाला 8 डिसेंबरला या सेवा मिळणार नाहीत. विशेष म्हणजे, रविवारी दिल्लीत निषेध करण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांचा अकरावा दिवस आहे. 8 डिसेंबरला शेतकर्‍यांनी भारत बंद पुकारला आहे.




8. सीएआयटी आणि ऑल इंडिया ट्रांसपोर्टर्स वेलफेयर एसोसिएशनने सांगितलं की, दिल्लीसह देशभरात बाजार खुले राहणार आहेत, तसेच परिवहन सेवाही सुरु राहतील.




9. शेतकरी आंदोलनाला बॉलिवूड सेलिब्रिटींनीही पाठिंबा दर्शवला आहे. प्रियंका चोप्रा, सोनम कपूर यांच्यासह अनेक कलाकारांनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. यात रितेश देशमुख, हंसल मेहता, गौहर खान, चित्रांगदा सिंह यांचा समावेश आहे. अभिनेता दिलजीत दोसांझने तर या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी एक कोटी रुपये दिले आहेत.




10. राजकीय पक्ष आणि शेतकरी संघटनांशिवाय या बंदला अनेक बॅंक कर्मचारी संघटनांनी देखील पाठिंबा दिला आहे. बॅंक यूनियन्सने सरकारला लवकरात लवकर या मुद्द्यावर तोडगा काढावा असं आवाहन केलं आहे. ऑल इंडिया बॅंक एम्प्लॉइज असोसिएशन (एआयबीईए)नं म्हटलं आहे की, सरकारने पुढं येऊन देश आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी त्यांच्या मागण्यांवर विचार करुन समाधान केलं पाहिजे.




महत्त्वाच्या बातम्या :













 




 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.