नवी दिल्ली : भारतीय फुटबॉल संघाचा माजी कर्णधार बायचुंग भुतियाने राजकारणाला रामराम ठोकला आहे. अवघ्या पाचच वर्षांच्या राजकीय कारकीर्दीनंतर 41 वर्षीय बायचुंगने बाहेर पडणं पसंत केलं. ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसला त्याने अलविदा केला.

आपण पश्चिम बंगालमधील सत्ताधारी पक्षातून बाहेर पडत आहोत, यापुढे देशातील कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नसू, असं बायचुंगने सोशल मीडियावर स्पष्ट केलं. 'तृणमूल काँग्रेस पक्षाचं सदस्यत्व, राजकीय पदांचा अधिकृतरित्या राजीनामा देत आहे' असं बायचुंग भुतियाने ट्विटरवर लिहिलं आहे.


2011 मध्ये बायचुंग भुतिया फुटबॉलमधून निवृत्त झाला होता. 2013 मध्ये त्याने राजकारणात उडी घेतली. तृणमूल काँग्रेसच्या तिकीटावर बायचुंग भुतिया दोन वेळा निवडणूक लढला होता. मात्र दोन्ही वेळा त्याच्या पदरी निराशा पडली.

2014 मध्ये दार्जिलिंगमधून त्याने लोकसभा निवडणूक लढवली होती, मात्र भाजपच्या एसएस अहलुवालियांकडून मोठ्या मताधिक्याने त्याला हार पत्करावी लागली. दोन वर्षांनी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत त्याने सिलीगुडीतून नशीब आजमावलं, मात्र माकपच्या उमेदवाराने त्याचा पराभव केला होता.

बायचुंग भुतियाने महिन्याभरापूर्वीच आपला निर्णय पक्षाला कळवला होता. कुठल्याही पक्षाशी निगडीत राहण्यात आपल्याला रस नसल्याचं त्याने सांगितलं होतं.