मॉरिसविल : भारत हा धर्मनिरपेक्ष देश असून प्रत्येक धर्माला आपला धर्म आणि संस्कृती जपण्याचे, वाढवण्याचे अधिकार आहेत. त्यामुळे, हिंदू, मुस्लीम, शीख, इसाई या सर्वच धर्माचे लोकं भारतात गुण्या-गोविंदाने नांदतात. त्यात, हिंदूंची संख्या अधिक असल्याने हिंदू धर्माच्या प्रचार व प्रसारासाठी हिंदू संघटना, धर्मपीठ आणि विविध संस्थांच्या माध्यमातून उप्रकम घेतले जातात. मात्र, साता समुद्रापलिकडेही आपला धर्म आणि संस्कृती जपली जात असल्याचं दिसून आलं. नुकतेच अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिना येथे दुसरी वार्षिक भगवद् गीता परीक्षा संपन्न झाली. 24 ऑगस्ट रोजी हिंदू सोसायटी ऑफ नॉर्थ कॅरोलिना येथे दुसरी वार्षिक गीता परीक्षा संपन्न झाली. संयुक्त विद्यमाने स्वयंसेवकांचे आयोजन करून, निधी उभारून आणि एक अनोखी स्पर्धा निर्माण करुन हिंदू समुदायाला एकत्र आणण्यासाठी संयोजकांनी मेहनत घेतली होती. साता समुद्रापार ही स्पर्धा यशस्वी आणि उत्स्फूर्तपणे पार पडल्याने संयोजकांच्या मेहनतीचं सार्थक झाल्याचा सर्वांनाच आनंद झाला आहे. 


हिंदू (Hindu) युनिव्हर्सिटी ऑफ अमेरिका, फ़्रेंड्स ऑफ हिंदू यूनिवर्सिटी ऑफ अमेरिका आणि एनसी विभाग प्रमुख डॉ. राज पोलावरम भगवद्ग गीता परीक्षा स्पर्धेनंतर बोलताना म्हणाले की, ''सध्या लोकं तात्पुरत्या, क्षणिक गोष्टींना ग्लॅमर बनवतात, पण भगवद् गीतासारख्या चांगल्या गोष्टींचा अधिक प्रचार व प्रसार व्हावा. त्यामुळेच आम्ही भगवद् गीता परिक्षेची ही संकल्पना मांडली. गीतापठणाच्या अनेक स्पर्धा आहेत, पण आम्हाला भगवद् गीतेच्या अर्थावरही जोर द्यायचा होता. त्यामुळे आम्ही हा उपक्रम गेल्यावर्षी सुरू केला आहे, आणि यावर्षी मिळालेल्या प्रतिसादामुळे आम्ही खूप आनंदी आहोत. अमेरिकेच्या (America) नॉर्थ कॅरोलिनामधील 52 पेक्षा जास्त विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले होते. 


प्राथमिक (K-4), माध्यमिक (8 वी आणि खालील) आणि उच्च माध्यमिक (9 वी श्रेणी आणि त्यावरील) गटांमध्ये ते विभागण्यात आले होते. प्राथमिक गटातील मुलांनी 25 श्लोकांच्या निवडक संचातून पाच श्लोकांचे उच्चारण केले आणि काही श्लोकांचा अर्थ सांगितला. माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मुलांनी लेखी परीक्षा दिली आणि अंतिम फ़ेरिसाठी निवडलेल्या विद्यार्थ्यांची गीतेच्या अर्थाविषयी तोंडी परीक्षा घेण्यात आली. मध्यांतरात, विद्यार्थ्यांनी गीता श्लोक अंताक्षरी या अनोख्या खेळात भाग घेतला आणि अध्याय 16 आणि 17 चे पठण केले. त्यानंतर, विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिकही वितरीत करण्यात आले. दरम्यान, डॉ. राज पोलावरम आणि डॉ. किशोर त्रिवेदी यांच्या हस्ते या स्पर्धेचे पारितोषिक वितरण झाले.


उच्च माध्यमिक विभाग:


मैथिली कुलकर्णी (एकंदरीत विजेती),
अमिशी गुप्ता (द्वितीय क्रमांक विजेता),
आयुष त्रिपाठी (तृतीय क्रमांक विजेता)


माध्यमिक विभाग:


जयंत अवुला (ज्युनियर विजेता)
जथिन अवुला (द्वितीय क्रमांक विजेता)
अक्षज वेमुरी (तृतीय क्रमांक विजेता)


प्राथमिक विभाग:


श्रीकीर्ती तिरुमलापेदिंती (पहिला - टाय)
रेणुश्री पालेमकोटा (पहिला - टाय)
रियान पटेल (तृतीय क्रमांक विजेता)


काय आहे HUA


हिंदू युनिव्हर्सिटी ऑफ अमेरिका हिंदू विचारांवर आधारित ज्ञान प्रणालींमध्ये शिक्षण प्रदान करते. ज्यामध्ये , तात्विक व विश्लेषणात्मक विचार पद्दतीने तत्वज्ञान, नैतिकता आणि आत्म-चिंतन यांचा समावेश आहे. शैक्षणिक उत्कृष्टता आणि स्वातंत्र्याच्या वातावरणात हिंदू धर्माची संस्कृती आणि परंपरा जोपासण्यासाठी वचनबद्ध, असे हे विद्यापीठ विद्यार्थ्यांना सेवा, नेतृत्व आणि जागतिक सहभागासाठीचं व्यासपीठ तयार करत आहे.


भगवद् गीता परिक्षेविषयी


भगवद् गीता परीक्षा हा हिंदू युनिव्हर्सिटी ऑफ अमेरिका (HUA), फ्रेंड्स ऑफ HUA N. कॅरोलिना चॅप्टर, हिंदू सोसायटी ऑफ नॉर्थ कॅरोलिना, NC चे श्री व्यंकटेश्वर मंदिर आणि रेडिओ नायरा यांनी हिंदूंना एकत्र आणण्यासाठी सहप्रायोजित केलेला संयुक्त उपक्रम आहे.