बंगळुरु : हेअर ट्रान्सप्लांट सर्जरीदरम्यान चेन्नईत तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच बंगळुरुतही 5 वर्षांच्या चिमुरड्यावर संक्रांत आली आहे. बोटाच्या शस्त्रक्रियेदरम्यान लक्ष नावाचा लहानगा कोमात गेल्याचं समोर आलं आहे. त्याच्या पालकांनी डॉक्टरांवर हलगर्जीचा आरोप केला आहे.


 
बंगळुरुच्या मल्ल्या रुग्णालयात पाच वर्षांच्या लक्षच्या बोटावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. 20 मिनिटांची सर्जरी तब्बल तासभर लांबल्याने पालक आधीच चिंतेत होते. एका तासाने ऑपरेशन थिएटर बाहेर येत डॉक्टरांनी लक्ष कोमात गेल्याचं पालकांना सांगितलं. फुफ्फुसं आणि हृदय कमकुवत असल्यामुळे तो कोमात गेल्याचा दावा डॉक्टरांनी केला.

 
लक्षच्या पालकांनी डॉक्टरांवर हलगर्जीचा आरोप केला आहे. 'लक्षच्या हृदयात काही गुंतागुंत झाल्याचं आम्हाला डॉक्टरांनी सांगितलं. मात्र हे खरं नाही. आमचा मुलगा पहिल्या दिवसापासून व्यवस्थित होता.' असं लक्षच्या वडिलांनी सांगितलं.

 
लक्ष आता मणिपाल रुग्णालयात लाईफ सपोर्ट सिस्टमवर असून त्याची जीवन-मरणाशी लढाई सुरु आहे. 10 जून रोजी शाळेत लक्षच्या बोटाला दुखापत झाली होती. त्यानंतर पालकांनी त्याला मल्ल्या रुग्णालयात नेलं.