नवी दिल्ली : माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या पार्थिवावर आज दिल्लीतल्या लोधी रोड येथील स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यंसस्कार करण्यात आले. यांच्या पार्थिवावर विद्युतदाहिनीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. स्वराज यांची कन्या बांसुरी स्वराज यांनी अंत्यविधी पार पाडले.

यावेळी स्वराज यांचे पती स्वराज कौशल, त्यांचे नातेवाईक, देशभरातील नेते मंडळी आणि त्यांच्या चाहत्यांनी साश्रुनयनांनी त्यांना अखेरचा सलाम केला. अंत्यविधीपूर्वी काही वेळ दिल्लीतील भाजप मुख्यालयात सुषमा स्वराज यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं.

सुषमा स्वराज यांना अखेरचा निरोप देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, रस्ते, महामार्ग आणि दळणवळण मंत्री नितीन गडकरी, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांच्यासह केंद्रातल्या प्रमुख नेत्यांची उपस्थिती होती.

काल (मंगळवारी)रात्री 9 च्या सुमारास सुषमा स्वराज यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यामुळे त्या बेशुद्ध झाल्या होत्या. त्यानंतर रात्री 9.30 च्या सुमारास त्यांना दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या 67 वर्षांच्या होत्या.

मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात स्वराज यांनी परराष्ट्रमंत्रीपद भूषवले होते. प्रकृती खालावल्यामुळे स्वराज यांनी यावर्षीची लोकसभा निवडणूक न लढण्याचे ठरवले होते.

सुषमा स्वराज या 1990 साली पहिल्यांदा खासदार झाल्या. अटल बिहारी वाजपेयी यांच्या 13 दिवसांच्या सरकारमध्ये त्या माहिती प्रसारण मंत्री होत्या. 1998 साली त्यांनी केंद्रीय मंत्रीमंडळाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्या दिल्लीच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री झाल्या. 2009 ते 2014 या काळात त्या लोकसभेच्या विरोधी पक्षनेत्या होत्या.