मुंबई : देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने व्याजदरात 0.90 टक्क्यांनी कपात केली आहे. 1 जानेवारी 2017 पासून म्हणजेच आजपासून या निर्णयाची अंमलबजावणी होईल, अशी माहिती एसबीआयने दिली आहे. यामुळे ग्राहकांचे वाहन कर्ज, गृहकर्जाचे हफ्ते कमी होतील.


लेंडिंग रेटमध्ये 8.90 टक्क्यांवरुन 8 टक्के एवढी कपात करण्यात आली आहे, असं एसबीआयने जारी केलेल्या अधिसुचनेत म्हटलं आहे. शिवाय जानेवारी 2015 पासून आतापर्यंत व्याजदरात दोन टक्क्यांनी कपात केली असल्याचंही बँकेने म्हटलं आहे.

पंजाब नॅशनल बँकेने देखील व्याजदरात कपात केली आहे. पीएनबीने 0.7 टक्के एवढी व्याजदरात कपात केली आहे. यामुळे गृहकर्जाच्या दरात 0.7 टक्क्यांनी कपात होण्याची शक्यता आहे.

युनियन बँक ऑफ इंडियानेही आता एसबीआय, आयडीबीआय, पीएनबी आणि त्रावणकोर बँकेनंतर व्याजदरात कपात केली आहे. यूनियन बँकेने लेंडिंग दरात 0.90 टक्के कपातीची घोषणा केली आहे.

स्टेट बँक ऑफ त्रावणकोरनेही गेल्या आठवड्यात व्याजदरात 0.30 टक्क्यांनी कपात केली होती. तर आयडीबीआयनेही वेगवेगळ्या प्रकारच्या व्याजावर 0.60 टक्के कपात केली आहे. नोटाबंदीनंतर बँकात मोठ्या प्रमाणात रक्कम जमा झाल्यामुळे बँकांनी हे पाऊल उचललं असल्याचं बोललं जात आहे.

रिझर्व बँकांच्या आकडेवारीनुसार 8 नोव्हेंबरला नोटाबंदीचा निर्णय जाहीर झाल्यानंतर 10 डिसेंबरपर्यंत बँकांमध्ये 12.4 लाख कोटी रुपये एवढी रक्कम जमा झाली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आपल्या भाषणामध्ये नोटाबंदीने व्याजदर कमी होतील, असा अंदाज वर्तवला होता.