नवी दिल्ली : तुम्ही आज नोटा बदलून घेण्यासाठी बँकेत जाण्याचा विचार करत असाल तर थांबा, कारण आज देशभरातील सर्व बँकांमध्ये फक्त ज्येष्ठ नागरिकांनाच नोटा बदलून मिळणार आहेत. इंडियन बँक असोसिएशनने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून बंद झाल्यानंतर, देशभर सध्या नोटा बदलून घेण्यासाठी बँकांसमोर रांगा लागल्या आहेत. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांचे हाल होतात. हे टाळण्यासाठी शनिवारचा दिवस फक्त ज्येष्ठ नागरिकांसाठी असेल. त्यामुळे म्हातारपणाचा आधार म्हणून ज्येष्ठ नागरिकांनी जुन्या नोटा बाळगून ठेवल्या असतील तर त्यांना त्या आज बदलता येतील.
मात्र बँकेत नोटा जमा करण्याचा आणि पैसे काढण्याचा व्यवहार इतर सामान्य नागरिकांनाही करता येणार आहे. पण त्यासाठी तुमचं अकाऊंट ज्या बँकेत आहे, त्याच बँकेत तुम्हाला जावं लागेल. इतर बँका तुम्हाला आज सुविधा देणार नाहीत, असंही इंडियन बँक असोसिएशनने स्पष्ट केलं.