मुंबई : देशभरातील खासगी, परदेशी आणि राष्ट्रीयकृत बँकातील सुमारे 10 लाख कर्मचारी तसंच अधिकारी, 28 फेब्रुवारी रोजी एक दिवसाच्या संपावर जाणार आहेत. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सच्या दिल्लीतील बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
देशातील नऊ बँक युनियन या राष्ट्रव्यापी संपात सहभागी होणार आहेत.
कामगार कायद्यात होणारे बदल, बँकांसमोरील समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी तसंच नोटाबंदीच्या काळातील मोबदला द्या, यासाठी हा संप पुकारण्यात आला आहे.
कर्मचाऱ्यांच्या आक्षेप आणि मागण्या
- नोटाबंदीनंतर पंतप्रधान बँक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या कामाचं कौतुक करत आहेत. पण दोन महिन्यात कर्मचाऱ्यांना त्याचा मोबदला मिळालेला नाही.
- शिवाय बाजारात दोन हजार रुपयांच्या बनावट नोटांचा सुळसुळाट झाला आहे. परंतु 500 आणि 2 हजार रुपयांच्या बनावट नोटा तपासणाऱ्या मशिन अद्याप एकाही बँक शाखेत पुरवलेल्या नाहीत.
- तसंच मोठ्या प्रमाणात कायम स्वरुपी कामासाठी कंत्राटी पद्धतीने भरती केली जात आहे.
- हे थांबवून तातडीने कायम स्वरुपी तत्त्वावर कर्मचारी भरती करण्याची संघटनेची मागणी आहे.