आगारतळा : त्रिपुरात अटक करण्यात आलेल्या दोन महिला पत्रकारांना गोमती सत्र न्यायालयाने जामिनावर सोडण्याचा आदेश दिला आहे. त्रिपुरातील हिंसाचाराच्या घटनेचे वार्तांकन करण्यासाठी आलेल्या दोन महिला पत्रकारांना आसाम पोलिसांनी आसाम-त्रिपुराच्या सीमेवर अटक केली होती. दोन्ही राज्यांच्या पोलिसांनी या घटनेला दुजोरा दिला होता. समृद्धी सकुनिया आणि स्वर्ण झा असं या महिला पत्रकारांची नावं आहेत.
विश्व हिंदू परिषदेच्या एका कार्यकर्त्यांने या दोन महिला पत्रकारांच्या विरोधात रविवारी त्रिपुरातील फाकिक्रोय पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. समृद्धी सकुनिया आणि स्वर्ण झा या महिला पत्रकार 'एचडब्लू न्यूज नेटवर्क'च्या पत्रकार आहेत. या दोन पत्रकारांनी त्रिपुराची प्रतिमा खराब केल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला होता.
आसाम पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोन महिला पत्रकारांना अटक केल्यानंतर रविवारी रात्री त्यांना सरकारी महिला आश्रय गृहात ठेवण्यात आलं होतं. सोमवारी सकाळी त्यांना त्रिपुरा पोलिसांना सोपवण्यात येणार होतं. आसाम पोलिसांनी या दोन्ही महिला पत्रकारांना सिल्चर विमानतळाच्या रस्त्यावर अटक केली होती. त्रिपुरा पोलिसांनी आसाम पोलिसांना या दोन्ही महिला पत्रकारांना अटक करण्याची विनंती केली होती. त्यावरुन आसाम पोलिसांनी त्यांना अटक केली होती.
गोमती जिल्ह्यातील एका मशिदीला आग लावपण्यात आल्याची माहिती या महिला पत्रकारांनी त्यांच्या सोशल मिडियावरुन दिली होती.
या दोन महिला पत्रकारांना अटक केल्यानंतर एडिटर्स गिल्डने त्याचा निषेध केला होता. तसेच त्यांना तात्काळ सोडण्याचा आदेश दिला होता, तसेच त्यांना ज्या ठिकाणी जायचं आहे त्याचं स्वातंत्र्य देण्याचा आदेश दिला होता.
महत्वाच्या बातम्या :
- त्रिपुरा हिंसाचाराच्या विरोधात राज्यातील आंदोलनांना हिंसक वळण, काही ठिकाणी मोर्चादरम्यान दगडफेक, शांततेचं आवाहन
- महाराष्ट्रातील माकडांना शेपट्या आपटत नाचायची गरज नव्हती; महाराष्ट्रातील हिंसाचारावर सामनातून टिकास्त्र
- Maharashtra Protest : त्रिपुरा घटनेचे महाराष्ट्रात पडसाद! ठिकठिकाणी बंदोबस्त वाढवला...