अयोध्या : 1992 साली बाबरी मशीद पाडल्याचा घटनेचा अंतिम निकाल आज लागला. या प्रकरणातील सर्व 32 आरोपी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. बाबरी मशीद विध्वंस पूर्वनियोजित कट नव्हता, असा निर्वाळा लखनौ कोर्टाने दिला आहे. या प्रकरणात साक्षीदार प्रबळ नव्हते असे कोर्टाने म्हटलं आहे. लालकृष्ण आडवाणी, उमा भारती, मुरली मनोहर जोशी यांच्यासह सर्व 32 आरोपींना निर्दोष मुक्त करण्यात आले आहे. ही घटना अचानक घडली असं देखील कोर्टानं म्हटलं आहे.


कोर्टाचा हा निकाल आल्यानंतर या प्रकरणातील आरोपी आणि भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांनी आनंद व्यक्त केला आहे. आडवाणी यांनी म्हटलं आहे की, ''आजचा हा निकाल अत्यंत महत्वपूर्ण आहे. आम्ही सर्वजण यामुळं अत्यंत आनंदी आहोत. ज्यावेळी निकाल ऐकला त्यावेळी जय श्रीराम म्हणून आम्ही या निर्णयाचं स्वागत केलं" असं आडवाणींनी म्हटलं आहे.


आता भारतात असा कुठला वाद होऊ नये - इक्बाल अंसारी
6 डिसेंबर 1992 रोजी मशीद पाडल्याबद्दल भाजप, आरएसएस, विहिंप नेते आणि कारसेवक यांच्यावरील फौजदारी खटल्याच्या या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून होते. यासंदर्भात पक्षकार इक्बाल अंसारी यांनी म्हटलं आहे की, आम्ही कोर्टाच्या निर्णयाचं स्वागत करतो. आम्ही भारतीय मुस्लिम आहोत. कोर्ट साक्षीदाराच्या आधारे निर्णय देतं. सीबीआय साक्षीदार देण्यास कमी पडलं. त्यामुळं निर्णय कोर्टानं दिला आहे. आता वाद संपला आहे ही चांगली गोष्ट आहे. आता भारतात असा कुठला वाद होऊ नये. देशात माणूस म्हणून माणसांकडे पाहावं. संविधानाच्या मार्गाने चालावं. देव आणि अल्लाहच्या सांगितलेल्या रस्त्यावरुन लोकांनी चालावं. हिंदू मुस्लिम वाद निर्माण होऊ नये, असं अन्सारींनी म्हटलं आहे.


32 आरोपींपैकी 26 आरोपी न्यायालयात उपस्थित


न्यायाधीश एस. के. यादव यांच्या न्यायालयात 32 आरोपींपैकी 26 आरोपी न्यायालयात उपस्थित होते. अनुपस्थित आरोपींना व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित राहण्याचे आदेश दिले. या सहा जणांमध्ये लालकृष्ण आडवाणी, उमा भारती, मुरली मनोहर जोशी यांच्यासह सहा जण गैरहजर होते. एक सप्टेंबर रोजी हा निकाल पूर्ण झाला असल्याची माहिती होती. दोन हजार पानांचं निकालपत्र असल्याची माहिती आहे. 6 डिसेंबर 1992 रोजी बाबरी मशीद पाडल्याप्रकरणी सीबीआयच्या स्पेशल कोर्टाने फैसला सुनावला. या प्रकरणात एकूण 49 आरोपी होते, ज्यापैकी 17 आरोपींचा मृत्यू झाला आहे.


या आरोपींची निर्दोष मुक्तता


लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, सुधीर कक्कर, सतीश प्रधान, राम चंद्र खत्री, संतोष दुबे आणि ओम प्रकाश पांडे, कल्याण सिंह, उमा भारती, रामविलास वेदांती, विनय कटियार, प्रकाश शरण, गांधी यादव, जय भानसिंग, लल्लू सिंह, कमलेश त्रिपाठी, बृजभूषण सिंह, रामजी गुप्ता, महंत नृत्य गोपाल दास, चंपत राय, साक्षी महाराज, विनय कुमार राय, नवीन भाई शुक्ला, धर्मदास, जय भगवान गोयल, अमरनाथ गोयल, साध्वी ऋतंभरा, पवन पांडे, विजय बहादुर सिंह, आरएम श्रीवास्तव आणि धर्मेंद्रसिंग गुजर


या निकालानंतर विश्व हिंदू परिषदेसह अनेक हिंदू संघटनांनी सेलिब्रेशन सुरु केलं आहे. मुंबई भाजप कार्यालयात देखील जल्लोष केला आहे. तसंच निर्दोष मुक्तता करण्यात आलेल्या आरोपींनी देखील आनंद व्यक्त केला आहे.


मोठी बातमी : बाबरी मशीद विध्वंस प्रकरणी सर्व 32 आरोपी निर्दोष