नवी दिल्ली : इंधन दरवाढीच्या मुद्द्यावरुन योगगुरू बाबा रामदेव यांनी सत्ताधारी काँग्रेसवर जोरदार टीका केली होती. सध्याच्या इंधन दरवाढीवरून मोदी सरकारलाही बाबा रामदेव यांनी इशारा दिला आहे. लवकरच इंधनाचे दर कमी केले नाही तर, मोदी सरकारला याचा फटका बसेल, असं बाबा रामदेव म्हणाले. एनडीटीव्हीच्या युवा कॉन्क्लेव्ह कार्यक्रमात बाबा रामदेव बोलत होते.
इंधनाचे दर नियंत्रित नाही केले तर आगामी निवडणुकीत हा मुद्दा भाजपला डोईजड होईल, असं बाबा रामदेव म्हणाले. तसेच सरकारने इंधनाचे दर नियंत्रित नाही केल्यास आगामी निवडणुकीत भाजपचा प्रचार करणार नाही, असा इशाराही बाबा रामदेव यांनी दिला आहे.
पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लवकरात लवकर योग्य पाऊल उचलण्याची गरज आहे. महागाईच्या मुद्द्याकडे वेळीच लक्ष न दिल्यास मोदी सरकारला भविष्यात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागेल, असं बाबा रामदेव म्हणाले. तसेच सरकारने श्रीमंतांच्या करात वाढ करुन सरकारी तिजोरी पैसा उभा केला पाहीजे, असाही सल्ला बाबा रामदेव यांनी दिला.
पेट्रोल आणि डिझेलच्या दराची शंभरीकडे वाटचाल सुरू आहे. परभणी-नांदेडमध्ये पेट्रोलच्या किमतींनी विक्रमी उच्चांक गाठला आहे. नांदेडमधील धर्माबाद तालुक्यात पेट्रोल 92.19 रुपयांवर पोहचलं आहे, तर परभणीत तब्बल 91.22 रुपये लिटरने पेट्रोलची विक्री होत आहे.
पेट्रोलच्या किमतीत आज 15 पैशांनी तर डिझेलच्या किमतीत 7 पैशांनी वाढ झाली. मुंबईत पेट्रोल 89.44 रुपये लिटरने विकलं जात आहे, तर डिझेल 78.33 रुपयांवर पोहचलं आहे.
संबंधित बातम्या
इंधन दरवाढ सुरुच, नांदेडच्या धर्माबादमध्ये पेट्रोल 92 रुपयांवर
पेट्रोलची टिच्चून आगेकूच, शतकापासून 12 रुपये दूर!
इंधन दरवाढीचा फटका, भाजीपाला दरात 20 ते 25 टक्क्यांनी वाढ
स्पेशल रिपोर्ट @830 | पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला, 'अच्छे दिन'चं स्वप्न हवेतच