नवी दिल्ली : सोशल माध्यमांमुळे एका रात्रीत संपूर्ण देशभरात पोहोचलेल्या दिल्लीतल्या 'बाबा का ढाबा'चे दिवस पुन्हा फिरले आहेत. प्रसिद्धी, मदतीच्या माध्यमातून पैशांचा ओघ, नवं रेस्टॉरंट हे सगळं पाहिल्यानंतर 'बाबा का ढाबा'चे चालक कांता प्रसाद हे पुन्हा आपल्या या टपरीवजा ढाब्यावर परतले आहेत. जे रेस्टॉरंट त्यांनी मदतीच्या पैशातून सुरु केलं होतं ते आर्थिक नुकसानीमुळे नीट चालू शकले नाही. पाच लाख रुपये त्यांनी या हॉटेलमध्ये गुंतवले होते पण महिन्याचा खर्च एक लाख रुपये होता. मात्र त्यातून उत्पन्न केवळ 35 ते 40 हजार रुपये महिना मिळत होतं. त्यामुळे बाबा आता पुन्हा रेस्टॉरंटच्या काऊंटरवरुन आपल्या जुन्या ढाब्यावर कामासाठी परतले आहेत.


लॉकडाऊनच्या पहिल्या लाटेत गोरगरीबांचे जे हाल झाले त्याचे हे बाबा म्हणजे जणू प्रतीक बनले होते. लोक जेवायलाही फिरकत नसल्याने त्यांची काय अवस्था झालीय हे सांगताना त्यांना अश्रू अनावर झाले होते. गौरव वासन नावाच्या यूट्युबरने त्यांचा व्हिडीओ बनवला आणि तो चांगलाच व्हायरल झाला. सोशल माध्यमावरुन लाखो रुपयांची मदत अवघ्या काही दिवसांत उभी राहिली. पण नंतर याच गौरव वासनवर बाबांनी पैसे लुटल्याचे आरोप केले आणि दोघांमधले संबंध बिघडले.




ढाबा, रेस्टॉरंट ते पुन्हा ढाबा हा सगळा नशीबाचा प्रवास करत कांता प्रसाद आता पुन्हा आपल्या मूळ जागी आले आहेत. आज तोच जुना ढाबा त्यांना रोजीरोटीसाठी मदत करत आहे. मधल्या काळात ढाब्यातही थोडे बदल झाले. छोट्या ढाब्यातही दोन सीसीटीव्ही कॅमेरे लागले आहेत. डिजीटल साईन बोर्डस आले आहे. पण हे भौतक बदल बाबांच्या नशिबातला बदल मात्र कायमस्वरुपी टिकवू शकले नाहीत. शॉर्टकट यशाचा असेल किंवा प्रसिद्धीचा तो फार काळ टिकत नाही, हेच या उदाहरणातून स्पष्ट होत आहे.