Deepotsav 2022 : दरवर्षीप्रमाणे यंदाही अयोध्या नगरी दीपोत्सवासाठी सज्ज झाली आहे. यंदा दीपोत्सवात विश्वविक्रम केला जाणार आहे. उत्तर प्रदेशच्या अयोध्या जिल्ह्यात म्हणजेच रामजन्मभूमीवर दरवर्षी दिवाळीनिमित्त दीपोत्सवाचं आयोजन करण्यात येतं. यंदा या दीपोत्सवात सुमारे 18 लाख पणत्या पेटवून विश्वविक्रम केला जाणार आहे. अयोध्येत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बनवण्याची संपूर्ण तयारी झाली आहे. रविवारी म्हणजे आज अयोध्येमध्ये दीपोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विशेष उपस्थिती असणार आहे. 


अयोध्येत फुलांची विशेष सजावट


दिवाळीनिमित्त आयोजित या सोहळ्यामध्ये आतिशबाजी, लेझर शो आणि रामलीलाचं आयोजन करण्यात आलं आहे. पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, शरयू काठावर एका भव्य संगीतमय लेझर शोचं आयोजन करण्यात येणार आहे. यावर्षी योगी सरकारकडून अयोध्येत भव्य दीपोत्सवाचं आयोजन करण्यात येणार आहे. श्री रामजन्मभूमी आणि रामलल्ला येथे फुलांची विशेष सजावट करण्यात आली आहे. खास विदेशी फुलांची सजावट करण्यात आली आहे.




18 लाख पणत्या, खास सजावट आणि आकर्षक रोषणाई


पंतप्रधान मोदी आज अयोध्या दौऱ्यावर आहेत. आज पंतप्रधान रामलल्लाचं दर्शन घेऊन दीपोत्सव समारंभाला उपस्थित राहणार आहे. यंदा दीपोत्सवात विश्वविक्रम केला जाणार आहे. सुमारे 18 लाख दिव्यांची आरास करण्यात येणार आहे. या दीपोत्सवानिमित्त 36 हून अधिक घाटांवर खास सजावट आणि आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. 22 हजारांहून अधिक स्वयंसेवकांनी मिळून या भव्य अयोध्या दीपोत्सवाची तयारी केली आहे. याशिवाय सुंदर वाळू शिल्पही साकारण्यात आले आहेत.


दीपोत्सवामुळे अयोध्येकडे पर्यटकांची क्रेझ वाढली


दीपोत्सवामुळे देशात आणि जगात अयोध्येचे जबरदस्त ब्रँडिंग झालं आहे. दरवर्षी दिवा लावण्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केला जातो. त्यामुळे दीपोत्सवामुळे अयोध्येकडे पर्यटकांची क्रेझ वाढली आहे. अयोध्येत येणाऱ्या देशी-विदेशी पर्यटक आणि भाविकांच्या संख्येत वाढ झाली आहे. 2017 च्या पहिल्या दीपोत्सवादरम्यान, शरयूच्या काठावर प्रज्वलित केलेल्या दिव्यांची संख्या 1.71 लाख होती. यंदा सुमारे 18 लाख दिवे लावण्याचे उद्दिष्ट असून लाखो दिव्यांची तयारी करण्यात आली आहे. सलग सहाव्या वर्षी अयोध्येच्या दीपोत्सवाच्या नावावर आणखी एक गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड जमा होणार आहे.