Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha : अयोध्येत (Ayodhya) 22 जानेवारीला होणाऱ्या भव्य राम मंदिरात (Ram Temple) रामललाची (Ram Lalla) प्राणप्रतिष्ठा होणार आहे. रामललाची प्राणप्रतिष्ठा आणि मंदिर उद्घाटनाची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. रामललाची बालस्वरूपातील मूर्ती गर्भगृहात ठेवण्यात आली आहे. 22 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रामललाच्या मूर्तीवर अभिषेक करण्यात येईल आणि प्राणप्रतिष्ठा पूर्ण होईल. यापूर्वी प्रभू श्रीरामाच्या मनमोहक बालस्वरूप मूर्तीचे फोटो समोर आले आहेत. ही मूर्ती अतिशय सुंदर आणि भव्य आहे. ही मूर्ती काळ्या दगडापासून बनवण्यात आलेली आहे.रामललाच्या मूर्तीमध्ये काय खास आहे आणि मूर्तीची सर्व वैशिष्ट्ये जाणून घ्या .


मूर्तीवर भगवान विष्णूचे दहा अवतार


रामललाच्या या मूर्तीसोबत दगडापासून आकाराची चौकट तयार करण्यात आली आहे. त्यावर भगवान विष्णूचे दहा अवतार कोरण्यात आले आहेत. ज्यामध्ये मत्स्य, कूर्म, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बुद्ध आणि कल्की यांचे अवतार आहेत. यासोबतच मूर्तीच्या एका बाजूला गरूड तर दुसऱ्या बाजूला हनुमान दिसत आहेत.


एकाच दगडात कोरली मूर्ती 


यासोबतच ही मूर्ती एकाच दगडापासून कोरण्यात आली आहे. ही मूर्ती तयार करताना दुसरा दगड जोडलेला नाही. रामललाच्या या मूर्तीमध्ये मुकुटाच्या बाजूला सूर्यदेव, शंख, स्वस्तिक, चक्र आणि गदा दिसेल. मूर्तीमध्ये रामललाचा डावा हात धनुष्यबाण धरण्याच्या मुद्रेत दाखवला आहे. मूर्तीचे वजन सुमारे 200 किलो आहे. मूर्तीची उंची 4.24 फूट आणि रुंदी तीन फूट आहे.


रामललाची मूर्ती काळ्या रंगाची


रामललाची मूर्ती काळ्या रंगाच्या दगडात कोरण्यात आली आहे. या काळ्या रंगाच्या दगडाचं खास वैशिष्ट्य आहे. या दगडावर दुधाचा किंवा पंचामृताचा अभिषेक केल्यानंतरही कोणताही परिणाम होणार नाही. रामललाच्या मूर्तीला अॅसिड किंवा इतर कोणत्याही पदार्थामुळे नुकसान होणार नाही. अनेक वर्षे ही मूर्ती अशीच राहील. त्याचा रंगही फिका होणार नाही. रामललाची ही मूर्ती अरुण योगीराज यांनी बनवली आहे.


10 लाख दिव्यांनी उजळणार अयोध्या 


राम मंदिरात 22 जानेवारीला रामललाचा अभिषेक आणि प्राणप्रतिष्ठा होणार आहे. अभिषेक सोहळ्यानंतर संध्याकाळी अयोध्या नगरी दिव्यांनी सजवली जाईल. यावेळी अयोध्येत 10 लाख दिवे लावण्याची तयारी सुरू आहे. प्राणप्रतिष्ठा सोहळा पूर्ण झाल्यानंतर 22 जानेवारीच्या संध्याकाळी अयोध्या 10 लाख दिव्यांनी उजळून निघणार आहे. सरयू नदीच्या काठावर मातीपासून बनवलेल्या दिव्यांनी अयोध्या उजळून निघणार आहे. याशिवाय, अयोध्येतील घर, दुकाने, आस्थापना आणि पौराणिक स्थळांवर ‘रामज्योती’ प्रज्वलित करण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Ram Mandir : प्रभू श्रीरामाला 114 कलशांच्या पाण्याने स्नान, रामललाच्या मंडपाची पूजा